भाजपात जाताच अशोक चव्हाणांनी आशिष शेलारांना केले काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष !

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला.यावेळी भाजपच्या व्यासपीठावरील आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण गडबडले. संपूर्ण आयुष्य काँग्रेस मध्ये घालवलेल्या अशोक चव्हाण यांच्या मनात अजूनही काँग्रेस पक्ष असल्याचे स्पष्ट झाले.पक्ष प्रवेशावेळी त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा उल्लेख चक्क काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष असा केल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांना खळखळून हसू आले.एवढी मोठी चूक लक्षात येताच अशोक चव्हाण यांनी आपली सारवासारव केली तर फडणवीस यांनी चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असे म्हटले आणि भाजपा प्रदेश कार्यालयात एकच हशा पिकला.

काँग्रेसचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दोन दिवसांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करणार होते मात्र आज मंगळवारी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, खा.प्रतापराव चिखलीकर, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, आ. प्रवीण दरेकर आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी आपली भूमिका मांडताना आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी भाजपाच्या व्यासपीठावरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा उल्लेख काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष असा केला केला.त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपा प्रदेश कार्यालयातील व्यासपीठावर उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांना हसू आवरले नाही. आपली चूक लक्षात येताच अशोक चव्हाण यांनी आपला पहिलाच दिवस असल्याचे सांगत सावरासावरी केली.तर फडणवीस यांनी चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असे म्हटले आणि भाजपा प्रदेश कार्यालयात एकच हशा पिकला.

यावेळी चव्हाण म्हणाले,मी विरोधी पक्षात असताना आमच्या जिल्ह्याला,मतदारसंघाला देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला.राजकारण एक सेवेचे माध्यम आहे.त्यामुळे मला कोणावरही वैयक्तिक टीका टीप्पणी करायची नाही.आमच्या काळात जे चांगले काम झाले त्यांचे फडणवीसांनी कौतुक केले, त्यांच्या काळात जे चांगले काम झाले त्यावेळी आम्हीही त्यांचे कौतुक केले. सभागृहात आम्ही एकमेकांविरोधात बोललो, पण सभागृहाबाहेर सोबत असायचो. यापुढे भाजपाच्या ध्येय धोरणानुसार, देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे काम करीन. मी कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही, ते सांगतील ती जबाबदारी स्वीकारणार, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

अशोक चव्हाण यांची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावरील – देवेंद्र फडणवीस

अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देणार का, असा सवाल विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यसभेचे उमेदवार भाजपाचे केंद्रीय नेते ठरवितात. येत्या काही दिवसांत त्याची यादी येईल, तेव्हा तुम्हाला समजेल. अशोक चव्हाण यांना प्रशासकीय आणि राजकीय अनुभव आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल असे. आम्ही कोणते लक्ष घेऊन चालत नाही. पण, आणखी काही नेते आमच्या संपर्कात आहेत. मी असे म्हणणार नाही की १४ -१५ आमदार येतील. पण, जमिनीशी जोडले गेलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचे आम्ही स्वागत करू, असे फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांची मदत कुठे लागेल, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी त्यांची मदत घेऊ, असेही फडणवीस म्हणाले.नाना पटोले हे एका पक्षात ठिकाणी टिकत नाहीत. यामुळे त्यांना फार गांभिर्याने घेऊ नका. अशोक चव्हाण यांची भाजपातील भूमिका काय असेल, हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. त्यांची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावरील आहे. त्यामुळे केंद्रातून निर्णय घेतला जाईल.एवढ्या वर्षांची पुण्याई सोडून हे लोक आमच्यासोबत का येतात, कारण काँग्रेसला घर सांभाळता येत नाही. भाजपाला विरोध करता करता, ते आता देशाच्या विकासाला विरोध करू लागले आहेत. त्यामुळे नेते का सांभाळता येत नाहीत, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Previous articleअशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार भाजपात जाणार ? चव्हाणांनी स्पष्टच सांगितले
Next articleअशोक चव्हाण डरपोक त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला