अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार भाजपात जाणार ? चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला.आमदाराकीच्या राजीनाम्यासह त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा,काँग्रेस कार्यसमिती सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यानंतर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.येत्या १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौ-यावर येत असून,त्यांच्या उपस्थित अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार भाजपात जाणार याच्या चर्चा जोर धरत असतानाच याबाबत अशोक चव्हाण यांनी माहिती दिली.

दोनच दिवसात काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे.माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांनी परवाच काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) पक्षात प्रवेश केला. त्यांनतर आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेवून आमदारकीचा राजीनामा दिला.आमदाराकीच्या राजीनाम्यासह चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यसमिती सदस्यत्वाचा आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा आहेत.याबाबत खुद्द चव्हाण यांनीच आपली भूमिका मांडली.मी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी बोललेलो नाही.कोण काय करेल, ते मला माहिती नाही.हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो.मी काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझे बोलणे झालेले नाही, असे चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.काँग्रेसमध्ये असताना प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले.कोणाबद्दल तक्रार करणार नाही.वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही.पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही.याबाबत विचार करून एक-दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेल, असेही त्यांनी सांगितले.

पक्ष सोडण्याचा निर्णय कधी पक्का केला ? यावर अशोक चव्हाण म्हणाले,प्रत्येक गोष्टीला काही कारण असलेच पाहिजे असे काही नाही. तसेच प्रत्येक कारण सर्वांना सांगितलेच पाहिजे असेही काही नाही. सगळ्याच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत.मी कधीही माझ्या पक्षांतर्गत बाबी लोकांसमोर, किंवा माध्यमांसमोर मांडल्या नाहीत.तसेच पक्षात काही उणीदुणी असतील तर मी ती कधीही चव्हाट्यावर मांडली नाहीत.मी सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये आहे.आता मला वाटते की मी अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे. काँग्रेस सोडणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिले आहे पण चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केले आहे. मी पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे.पक्षाने मला मोठे केले असेल तर मीपण पक्षासाठी काही कमी केले नाही.विरोधी पक्षात असूनही राज्य सरकारने तुमच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी दिला आहे.यावर अशोक चव्हाण म्हणाले की,मी राज्याचा मंत्री असताना भाजपसहित सर्वपक्षीयांना विकासाच्या कामात मदत केली.मंत्री शेवटी सर्व राज्याचा असतो, एका पक्षाचा नसतो. त्यामुळे माझ्या कार्यकाळात मी सर्वांना निधी दिला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.राज्यसभेच्या तोंडावर चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असल्याने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.येत्या १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत.त्यावेळी चव्हाण हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

आगे आगे देखो होता है क्या !…देवेंद्र फडणवीस

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावर उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिला आहे.सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे दोखो होता है क्या असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले. आज फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला.ज्यांचा जनतेशी जवळीक आहे असे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत असे स्पष्ट करून, आगे आगे देखो होता है क्या असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.

Previous articleअन्यथा खासगी शाळांच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार नाही
Next articleभाजपात जाताच अशोक चव्हाणांनी आशिष शेलारांना केले काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष !