देशात चित्ते आणल्याने रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का ? अजित पवारांचा रोखठोक सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशात व महाराष्ट्रातील महागाईचे,बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जात आहेत. आता देशात चित्ते आले ठिक आहे ते वाढावेत,पशूधन वाढावे हेही ठीक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का ? वेदांताचे काय होणार आहे ते सांगा,तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्यासाठी अजून किती लाख कोटीची गुंतवणूक येणार हे सांगा असा रोखठोक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रसरकारला केला.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रसरकार आणि राज्यसरकारवर हल्लाबोल केला.यावेळी त्यांनी राजकारणात होणाऱ्या वैयक्तिक टिकेवर नाराजी व्यक्त केली.वेदांतासारख्या प्रकल्पातून राज्यात गुंतवणूक येत असताना राष्ट्रवादी या चांगल्या कामाला नक्कीच पाठिंबा देईल. मात्र त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये असेही पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.वेदांताचा फॉक्सकॉन प्रकल्प होता त्याबद्दल चर्चा बरीच झाली. आता मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत.त्यांनी याचा पाठपुरावा करावा आणि बेरोजगारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावावे असे सांगतानाच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे राज्यात मोठमोठे प्रकल्प यावेत असा प्रयत्न सुरू होता. मात्र काही पक्षातील लोक वेगळया मागण्या केल्या होत्या म्हणून प्रकल्प गेला असे वक्तव्य केली जात आहेत.मी उपमुख्यमंत्री असताना असे अजिबात झालेले नाही कारण नसताना संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे.जर कुणाला वाटत असेल तर केंद्रसरकार, राज्यसरकार, यंत्रणा तुमच्या हातात आहेत.तर चौकशी करावी पण वेगळी वक्तव्य करुन बेरोजगारांमध्ये गैरसमज निर्माण करु नये.वास्तविक असं काही घडलेले नाही तरीपण चौकशी करायची असेल तर जरुर करा ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या असे थेट आव्हानच पवार यांनी शिंदे सरकारला दिले.

Previous articleमोठा दिलासा : कोरोना काळात आदेशाचे उल्लंघन केल्याने दाखल झालेले खटले मागे घेणार
Next articleआरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर आरोप करणा-यांच्या विरोधात काय भूमिका घेणार