बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई नगरी टीम

मुंबई । बारावीच्या मार्च-एप्रिलच्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील ५ मार्च आणि ७ मार्च रोजी होणा-या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी आता ५ एप्रिल आणि ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.त्यानुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दिनांक ५ मार्च रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच दुस-या सत्रात होणारी जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार ५ एप्रिल रोजी नियोजित वेळेत होईल.तर, सोमवार ७ मार्च रोजी प्रथम सत्रात होणारी मराठी,गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक,देवनागरी) मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली विषयांची तसेच द्वितीय सत्रात होणारी उर्दू,फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली विषयांची परीक्षा आता ७ एप्रिल रोजी नियोजित वेळेत होईल.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक,प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

Previous articleमविआ नवाब मलिकांच्या पाठीशी; मोदी,भाजप आणि ईडीच्या नावाने घातला शिमगा
Next articleनवाब मलिकांना राजीनामा द्यावाच लागेल ! राजीनामा देईपर्यंत आंदोलन चालूच राहणार