नवाब मलिकांना राजीनामा द्यावाच लागेल ! राजीनामा देईपर्यंत आंदोलन चालूच राहणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । दाऊद इब्राहिम या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने अटक केलेले अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले.नवाब मलिक यांनी राजीनामा देईपर्यंत भाजपाचे आंदोलन चालू राहील असा इशारा यावेळी पाटील यांनी दिला.

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केल्यानंतर मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. प्रसाद लाड, माजी खासदार किरीट सोमय्या व आ. कॅप्टन तमिळ सेल्वन यांच्यासह अनेक कार्यकर्ते निदर्शनात सहभागी झाले होते.दाऊद हा देशाचा दुश्मन आहे व त्याच्याशी संबंध असणाराही देशाचा दुश्मन असल्याचे मान्य करा. नवाब मलिक यांना आता मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिला नाही.त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. ठाकरे सरकारमध्ये गुन्ह्यांमध्ये गुंतलेले अनेक मंत्री आहेत. इतक्या भ्रष्ट आणि गुन्हे करणाऱ्या मंत्र्यांना घेऊन ठाकरे सरकार चालविणार का असा प्रश्न आहे. आता या सरकारलाच सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही असे पाटील यावेळी म्हणाले.भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने मारले आहेत. या सरकारने अनेकदा घटनेचे उल्लंघन केले आहे. त्याचे सविस्तर निवेदन भाजपा राज्यपालांना सादर करण्यात येणार असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे टाळता येणार नाही असे सामान्य माणसालाही वाटते असेही पाटील यांनी सांगितले.

Previous articleबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
Next articleआता तुरुंगात कोण जाणार ? सोमय्यांनी जाहीर केली १२ नेत्यांची नावे