मविआ नवाब मलिकांच्या पाठीशी; मोदी,भाजप आणि ईडीच्या नावाने घातला शिमगा

मुंबई नगरी टीम

मुंबई । मनी लॅान्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले.यावेळी ईडी मुर्दाबाद,मोदी सरकार हाय हाय,मोदी सरकार चोर है,महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा,महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार, आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि पदाधिका-यांनी परिसर दणाणून सोडला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना समर्थन देण्यासाठी व मोदी सरकारचा व त्यांच्या केंद्रीय यंत्रणांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केले या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते,मंत्री आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पंतप्रधान मोदी आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक,नगरसेवक कप्तान मलिक,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार,खनिज व बंदरेमंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) सतेज ऊर्फ बंटी पाटील, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी, लोकभारतीचे शिक्षक आमदार कपिल पाटील, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी खासदार हुसेन दालवाई, माजी मंत्री नसीम खान, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना आमदार सुनील राऊत, आमदार मनिषा कायंदे, शिवसेना उपनेते सचिन अहिर, आमदार यामिनी जाधव, आमदार योगेश कदम, माजी आमदार विनोद घोसाळकर,राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार अशोक पवार, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार संजय जगताप, आमदार संजय दौंड, आमदार चेतन तुपे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अजय चौधरी, आमदार सुनिल शिंदे, आमदार सुनिल अण्णा टिंगरे, आमदार कारेमोरे, आमदार चंद्रीकापुरे, भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार हेमंत टकले,आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, युवक, युवती व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या ह्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे,असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.२० वर्षापूर्वीच्या एका प्रकरणाशी काहीतरी करुन धागेदारे जुळवण्याचा प्रयत्न करुन नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधातील लढ्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी राजीनामे दिले होते काय ? याचे आधी उत्तर द्यावे. ज्यांच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.ह्यावेळी सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की,नवाब मलिक यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली असून हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरु झाले आहे. मंत्र्याला अशापद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक आहे. केवळ संशयाच्या आधारावर ही कारवाई केलेली असून हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.

Previous articleनवाब मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी ; मंत्रीपदाचा राजीनामा घेणार नाही
Next articleबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल