मविआच्या काळात लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद पाडले

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद करण्यात आले होते.त्या सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते,सर्वांना अहंकार होता,अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.शिवसेनेच्या उपनेत्या आणि ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

शिवसेनेच्या ( उबाठा ) उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवेसेनेत प्रवेश केला.त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर बंद करण्यात आलेल्या लोकहिताच्या प्रकल्पांना आमच्या सरकारने चालना दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारडून राज्याच्या विकासकामांना आवश्यक तेवढा निधी मिळत आहे.राज्याच्या प्रत्येक विकासाच्या प्रस्तावाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास मंदावला होता आता आम्ही पुन्हा जोमाने काम करुन २०१४ च्या सरकारमधील लोकहिताचे प्रकल्प आम्ही सुरु केले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार केंद्राकडून निधी मिळत नसल्याची टीका करत होते,मात्र कोणी निधी आणून देत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळे प्रकल्प थंडावले होते. आता राज्य पुन्हा प्रगतीपथावर वेगाने जात असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने बाळासाहेबांची शिवसेना हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर सर्वांचा विश्वास आहे त्यामुळे हे प्रवेश होत आहेत, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे.आजचा प्रवेश ऐतिहासिक आहे, नीलम गोऱ्हे यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. शिवसेना भाजप युती मजबूत आहे व मनापासून झालेली आहे, हे यातून समोर आले आहे. आमची युती वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन हे युती सरकार आले आहे. वर्षभरात धडाकेबाज निर्णय घेतले. लोकांच्या मनात स्थान मिळाले आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकहिताच्या कामांवर मर्यादा आली होती, अनेक प्रकल्प राजकीय हेतूने बंद करण्यात आले. मात्र आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर लोकहिताचे, विकासाचे प्रकल्पांना वेग आला. आम्ही विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली. शिवसेना व धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. मात्र काही जण त्यांच्या समाधानासाठी आपल्या सोयीचा अर्थ काढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम, त्यांची भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत. स्वप्नवत वाटणारी कामे मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास जात आहेत. बाळासाहेबांच्या भूमिकेसोबत कधीही तडजोड होणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवसेना भाजप युती त्यांच्या विचारांवर झाली आहे. त्यांचे विचार मोदी-शहा पुढे नेत आहेत. राम मंदिर उभारणी वेळी चेष्टा झाली मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वाची सर्व कामे पूर्ण होत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Previous articleसटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची गरज नाही ; नीलम गोऱ्हेंचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
Next articleमला काही करायचं असेल तर “डंके की चोट पे” करेन : पंकजा मुंडेंचा इशारा