सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची गरज नाही ; नीलम गोऱ्हेंचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत असून,मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन शिक्कामोर्तब केले आहे.एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर आहे.महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेत आपण कार्यरत राहणार असल्याचे नीलम गोऱ्हे स्पष्ट केले. अयोध्येत राम मंदिर,समान नागरी कायद्याबाबत सकारात्मक पावले, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मिरमध्ये तिरंगा, बाळासाहेबांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केले त्यांच्यासाठी काम केले जात आहे, त्यामुळे आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.कोणत्याही सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांना लगावला.

शिवसेनेच्या ( उबाठा ) उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवेसेनेत प्रवेश केला.त्यावेळी त्या बोलत होत्या.महिला विकास व महाराष्ट्र,देशविकासाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय विश्वासार्हता, मराठी व हिंदुत्व, महिला धोरण तसेच सामाजिक न्याय या प्रश्नावर असणारा एनडीए सोबत असणारा राजकिय पक्ष म्हणजे शिवसेना या पक्षात मी प्रवेश केला होता. शिवसेनेत मला खूप चांगले काम करता आले.पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे.१९८५ च्या शहाबानो बेगम खटल्यात न्यायालयाने शहाबानोला पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता. तथापि विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला कायदा १९८६ संमत केला. परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव व अन्याय सहन करावा लागला. त्यामुळे सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात समान न्याय मिळावा अशी आवश्यकता आहे.गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय स्तरावरील या भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांवर आयुष्य समर्पित केले,त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना, महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय घेत आहे, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. मी उपसभापती पदावर असल्याने त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. आमची युती भावनात्मक आहे. नीलम गोऱ्हेंनी अतिशय चांगला निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

Previous articleसरकार पडणार या केवळ अफवा; शिवसेनेतील आमदार नाराज नाहीत
Next articleमविआच्या काळात लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद पाडले