उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा फोटो सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत बसवला

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली आहे. आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत नेऊन बसवला अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, ५० ठिगळे एकत्र करून गोधडी बनवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. आपल्या पक्षात तुकडे पडले आहेत आणि त्याला समाजवादाची ठिगळ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या विचारांशी किती प्रतारणा करू शकतो याचे जिवंत उदाहरण उद्धव ठाकरे आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जाज्वल्य हिंदुत्व मांडलं त्यांच्या सुपुत्राने काय करून दाखवले. त्याची यादी मोठी आहे. शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवेन म्हटलं आणि स्वतः मुख्यमंत्रीपदी बसले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पंक्तीत नेऊन बसवला. बाळासाहेब यांच्या सुपुत्राने अहमद पटेल समोर कुर्नीसात घालणारे चित्र दाखवलं. राम मंदिरावर प्रश्न निर्माण करून राम मंदिराच्या वर्गणीची चेष्टा केली. विशिष्ट वर्गाच्या मतासाठी लांगुलचालनाची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली. हे सर्व हिंदुस्थान आणि महाराष्ट्र पाहतो आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सत्काराबद्दल झालेल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले, पाकिस्तानी खेळाडूंच्या स्वागताशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. बीसीसीआयचा ही संबंध नाही हा आयसीसीचा कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे यांना विस्मृती झाली असेल त्यांना आठवण करून देतो आम्हाला प्रश्न विचारायची हिम्मत त्याने करावी जो स्वच्छ आहे. उद्धव ठाकरे तुमच्या घरात दाऊदचा जावई असलेला पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियादाद यांना तुम्ही बिर्याणी खायला घातली. तुम्ही आता आम्हाला प्रश्न विचारू नये. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना भारतावर हल्ला करणाऱ्यांना साथ देणाऱ्या याकूब मेमनच्या थडग्याला फुलांनी सजवण्याचे काम केले. त्यांनी आता आम्हाला प्रश्न विचारण्याची हिंमत करू नये, असेही ते म्हणाले.

Previous articleधनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले महत्वाचे निर्णय
Next articleहिंदुस्थान ट्रॅक्टर पाहून धनंजय मुंडेंना झाली वडिलांची अन बालपणाची आठवण !