उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायदा करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रात आज लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून हिंदू मुलींना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे.उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बेकायदेशीर धर्मांतर बंदीचा कायदा आणला आहे.उत्तर प्रदेशात एवढा स्वच्छ,सरळ कायदा येत असेल तर महाराष्ट्रातही अशा प्रकारचा कायदा आला पाहिजे अशी आग्रही मागणी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रस्तावावर बोलताना दरेकर म्हणाले की,लव्ह जिहादसारख्या घटना राज्यात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.हिंदू मुलींना फसवून,चुकीची माहिती देऊन, जबरदस्तीने प्रलोभने दाखवून स्वतःची चुकीची नावे ठेवून प्रेमाचे नाटक करून फसवले जाते, धर्मांतर करायला भाग पाडले जाते. विवाहाचे नाटक केले जाते. नंतर अत्याचार करून सोडून दिले जाते किंवा मारून टाकले जाते. यावेळी दरेकर यांनी उत्तर प्रदेश येथील योगी आदित्यनाथ सरकारने बेकायदेशीर धर्मांतर बंदीचा कायदा आणल्याचे सांगितले.हा कायदा धार्मिक धर्मांतराच्या बेकायदेशीर प्रक्रिया, तसेच धार्मिक परिवर्तनास प्रतिबंध करतो. अशा कायद्याची आपल्याकडेही आवश्यकता आहे. उत्तर प्रदेशात एवढा स्वच्छ, सरळ कायदा येत असेल तर महाराष्ट्रातही अशा प्रकारचा कायदा आला पाहिजे अशी कळकळीची विनंतीही दरेकर यांनी यावेळी केली.

तसेच कुठल्याही राज्याचा विकास, प्रगती ही त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर अवलंबून असते. तशा प्रकारची कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित असेल तर उद्योगधंद्यांनाही प्रोत्साहन मिळते. महायुतीच्या सरकारमध्ये अभिमान वाटतो. गेल्या वर्षभराच्या काळात राज्यातील कायदा-सुव्यवस्था हाताळण्यात बऱ्यापैकी पोलीस खाते यशस्वी झालेले आहे. कुठल्याही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचे मोजमाप करताना नेमके गुन्ह्यांमधील कंव्हेक्शन किती झाले, गुन्हे घडताहेत, तपास चालू आहे, गुन्हे कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकार कुठलेही असो ते करत असते. परंतु असणाऱ्या गुन्ह्यामध्ये दोष सिद्ध करून त्यांना शिक्षा करण्याचे प्रमाण वर्षभराच्या कालावधीत वाढले असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच स्कॉटलंड पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचा सातत्याने गौरव करतो. मुंबई हे गजबजलेले शहर आहे. व्यवस्था मोठ्या प्रमाणावर लागतात. अशा परिस्थितीतही मुंबईवर आपत्ती, संकट येओ या मुंबईला सावरण्याचे काम सातत्याने पोलिसांनी केले असल्याचेही ते म्हणाले.
अलीकडच्या काळात जी-२० झाली. मोठ्या प्रमाणावर जगभरातून शिष्टमंडळ आले होते. जगभरातुन शिष्टमंडळ येतात त्यावेळेला पूर्णपणे व्यवस्था चोख करणे, त्यांचे संरक्षण करणे हे जिकिरीचे काम असते. ते मुंबई पोलिसांनी केले आहे. सध्या सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्या सायबर गुन्ह्यांकरिता १३ डेडिकेट्स सायबर सेल मुंबई शहरात उभारण्यात आलेत. निश्चितच मुंबईकरांना दिलासा देणारी ही गोष्ट आहे.अमली पदार्थ हा प्रश्न आपल्या सर्वांना भेडसावणारा आहे. शाळा, महाविद्यालय तेथील टपरीवर एमडी विकले जाते. अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ पान टपऱ्यांवर सर्रास विकले जातात. अशा प्रकारच्या टपऱ्या हटविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पोलीस आणि महापालिका यांच्या समन्वय असणे गरजेचे आहे. सध्या अशा प्रकारच्या २५०० अमली पदार्थांच्या पान टपऱ्या उध्वस्त करण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले आहे. साधारणतः ४० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. उद्याच्या तरुण पिढीला नासवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखी काळजी घेण्याची गरज असल्याचेही दरेकर म्हणाले.५ हजार पोलिसांनी स्वतः पैसे काढून पनवेल येथे काही एकर जागा घेतली आहे. त्या प्रकल्पत, सोसायटीत वाद निर्माण झालाय. त्यामुळे त्यांचे भविष्य काय? लाखो रुपये जमा होऊनही त्यांना घर मिळत नाही. गृहनिर्माण मंत्री, सरकारने यात लक्ष घालून ५ हजार पोलिसांचा घर निर्माण करण्याचा विषय मार्गी लावावा, अशी विनंतीही दरेकर यांनी यावेळी केली.

Previous articleदेशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात
Next articleविकृत भिडेला बेड्या घालून जेलमध्ये टाका : भडकलेल्या बाळासाहेब थोरातांची मागणी