मुंबईचा जोशीमठ झाला तर कोण जबाबदार ? आदित्य ठाकरेंचा ‘शिंदे सरकार’ला रोखठोक सवाल

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईतील रस्त्यांच्या कामावरुन शिवसेना नेते,आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गेल्या आठवड्यात गंभीर आरोप करीत,मुंबई महानगरपालिकेतील रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून पुन्हा शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला आहे. ६ हजार कोटी रुपयांचे काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होत असताना कोठेही लोकप्रतिनिधींना विचारण्यात आले नाही. हा प्रत्येक पक्षातील नगरसेवकांचा अपमान आहे,असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी सरकारला १० रोखठोक सवाल केले आहेत. तुम्ही मुंबईकरांचा पैसा वापरुन जे रस्ते एका वेगळ्या पद्धतीने बनवत आहात, यासाठी त्यांनी १० प्रश्न उपस्थित करीत त्याचे उत्तर द्यावे असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.मुंबईत ४०० किलोमीटरचे रस्ते आहे, हे तुम्हाला कोणी सांगितले. यासाठी तुम्हाला कोणी प्रस्ताव दिला,लोकशाही मध्ये ४०० किलोमीरचे रस्त्याचे एवढे मोठे काम, सहा हजार कोटीचे काम एका प्रशासकाने मंजूरी देणे, म्हणजे स्वत:च प्रस्ताव देणे आणि स्वत:च मंजूरी देणे हे योग्य आहे का,साडे सहा हजार कोटी रुपये फंड अर्थसंकल्पात कसा दाखवणार,४०० किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी कालावधी दिला आहे का.जो किलोमीटरचा रस्ता १० कोटी रुपयांना व्हायचा तोच रस्ता आता १७ कोटी रुपयांना होणार आहे, तो २० टक्क्यांनी का वाढवला.जास्त कॉक्रेटीकरण चांगले नाही, ते परवडणारे नाही, मुंबईचा जोशी मठ झाला तर याला जबाबदार कोण.काम दिलेल्या कंत्राटदारांना मुंबईत काम केल्याचा अनुभव आहे का.आयआयटी सारख्या संस्थेकडून अहवाल घ्यायचा असतो, ४०० किलोमीटर रस्स्त्यांसाठी असा अहवाल घेतला आहे का. देशात पाचच कंत्राटदार आहेत का. देशात एवढे मोठे फक्त पाच कंत्राटदार आहेत का असे एकूण १० प्रश्न आदित्य ठाकरे यांनी सरकारला केले आहेत.

आता पालिकेकडून यावर एक पत्रक येईल. त्यात गोडगोड लिहून येईल.सर्व पक्षांना हे पटणारे आहे का ? आम्ही अजुनही यासाठी आंदोलने केलेली नाहीत.पण, मी सर्वच पक्षांना आपील करतो,ही गद्दारांची टोळी येऊन हात मारुन जातील. आपल्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, हे सगळे असताना आता सुरू असलेल्यामुळे महापालिकेची मुदत ठेव तोडावी लागेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. कधीही जे आतापर्यंत घडले नाही, ते आता घडत आहे, ते तुम्हाला पटणारे आहे का ? असा सवालही त्यांनी केला. मुंबईत सगळीकडे काँक्रिटीकरण झाले आहे. आधी जिथे मातीची मैदाने होती, तिथेही काँक्रिटीकरण झाले. त्यामुळे हे सगळे झाल्यावर मुंबईचा जोशीमठ झाला, तर याला जबाबदार कोण ? असा परखड सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. जगातील कोणत्याही शहरात १०० टक्के काँक्रिटीकरण झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Previous articleरस्त्याच्या कामाच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप ! कंत्राटदारांना ४८ टक्क्यांचा फायदा
Next articleमुजोर बँकांना कडक शब्दात समज देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या