नवाब मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी ; मंत्रीपदाचा राजीनामा घेणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । इक्बाल कासकर याच्या जमीन व्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाने ३ मार्च पर्यंत म्हणजे ९ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.तर नवाब मलिकांवरील आरोप सिद्ध झाले नसल्याने त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.त्यामुळे मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान या कारवाईच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार आहेत.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या जमीन व्यवहार प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज पहाटे अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.सुमारे ८ तास चाललेल्या चौकशी नंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक करून विशेष न्यायालयात हजर केले.अडीच तासांचा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपल्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ३ मार्च पर्यंत म्हणजेच ९ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.मलिक यांना न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकार मधिल मंत्री यांची महत्वाची बैठक पार पडली.मलिक यांचा राजीनामा घेवू नये असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले .मलिक यांच्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले नाहीत.त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही,अशी स्पष्टोक्ती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी देत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यावर त्यांचा राजीनामा घेतला नसल्याकडे लक्ष वेधले.तर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही मलिक यांचा राजीनामा घेवून नये असे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान मलिक यांच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या सकाळी १० वाजता ठाकरे सरकार मधिल मंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करणार आहेत.तसेच महाविकास आघाडीच्यावतीने परवा शुक्रवारी राज्यभर शांततेत आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

Previous articleनवाब मलिक जाहीरपणे बोलतात,त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल याची खात्री होती
Next articleमविआ नवाब मलिकांच्या पाठीशी; मोदी,भाजप आणि ईडीच्या नावाने घातला शिमगा