मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी
पुणे : विठ्ठल पूजेला विरोध करणारे छत्रपतींचे मावळे होऊच शकत नाही असे वक्तव्य करीत पंढरपूर येथे शासकीय पूजेसाठी उपस्थित न राहता त्याचे खापर मराठा समाजावर फोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याबद्दल त्यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड-मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड , राज्य समन्वयक शांताराम कुंजीर आणि इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला महापूजेसाठी जाण्याचे रद्द केल्यानंतर माध्यमांशी केलेल्या वक्तव्यावरून आता नविन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दर्शनासाठी येण्याविषयी घातपात होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.त्यांनी तो अहवाल जाहीर करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड-मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी करणारी मुलेही वारकऱ्यांचीच मुले आहेत.त्यामुळे त्यांना घातपाती ठरविणे वारकऱ्यांना अपमान आहे अशी टीकाही त्यांनी केली.
काल मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस होता शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर होते, त्यामुळे त्यांनी पंढरपूरला पूजेला जाण्याचे रद्द केले. असे असताना त्याचे खापर मात्र सर्वसामान्यांवर फोडले आणि वारकऱ्यांसह राज्यातील जनतेचीही दिशाभूल आणि फसवणूक केली असा दावाही त्यांनी केला.सरकार स्वतः न्यायालयात अहवाल लवकर सादर करत नसल्याने आरक्षण मिळण्यास उशिर होत आहे असेही तेम्हणाले.मराठा क्रांती मोर्चाकडून दोन वर्षांपूर्वी अतिशय शांततेच्या वातावरणात मराठा समाजाने ५८ मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात काढले. त्यामध्ये कोठेही गोंधळ झालेला नाही. परंतु, मुख्यमंत्री हे मात्र सोयीस्कररित्या भूमिका घेतात. त्यामुळे त्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा आगामी काळात राज्यातील वातावरण बिघडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.