पीक विमा भरण्याची मुदत ३१ जूलै पर्यंत वाढवली ; परिपत्रक जारी
पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शेतक-यांना दिलासा
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागणीला यश आले असून शेतक-यांसाठी पीक विमा भरण्याची मुदत आता ३१ जूलै पर्यंत वाढविण्यात आली आहे, तसे परिपत्रक शासनाच्या कृषी विभागाने आज जारी केले.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतक-यांसाठी अंतीम मुदत ३१ जूलै होती परंतु बिगर कर्जदार शेतक-यांसाठी मात्र ही मुदत २४ जूलै पर्यंतच होती. ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी शेतक-यांना गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क प्राॅब्लेम व इतर समस्यांमुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. विमा भरण्याची मुदत उद्या संपणार असल्याने शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला होता. नागपूर येथे अधिवेशनावेळी कांही शेतक-यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन पीक विमा भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी केली होती. ना. पंकजा मुंडे यांनी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून शेतक-यांची कैफियत त्यांच्या कानावर घालून मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने आज परिपत्रक जारी करून पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी येणा-या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पीक विमा भरण्याची मुदत ३१ जूलै पर्यंत वाढवली असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी विमा भरण्याची मुदत वाढवून त्यांना दिलासा दिल्याबद्दल शेतक-यांनी त्यांचे आभार मानले आहेत.