मुंबईसह नवी मुंबई  ठाणे रायगडमध्ये उद्या मराठा कृती मोर्चाची बंदची हाक  

मुंबईसह नवी मुंबई  ठाणे रायगडमध्ये उद्या मराठा कृती मोर्चाची बंदची हाक  

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज मराठा कृती मोर्चाच्यावतीने मुंबई आणि उपनगर वगळता बंदची हाक देण्यात आली होती.आता मराठा कृती मोर्चाच्यावतीने उद्या बुधवारी मुंबईसह ठाणे ,पालघर रायगड आणि नवी मुंबईत बंदची हाक देण्यात आली असून, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.दादरच्या शिवाजी मंदिर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या  समन्वयकांची आज बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात असल्याचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सध्या राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करत असताना गंगाखेडच्या युवकाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठवाड्यात बंदची हाक देण्यात आली होती.मात्र आषाढी एकादशीवरून मुंबईत परतणाऱ्या वारक-यांना याचा त्रास होऊ नये म्हणून मंगळवारी बंद घोषित करण्यात आला नव्हता.मात्र आता उद्या बुधवारी मुंबईसह ठाणे,पालघर रायगड आणि नवी मुंबईत बंदची हाक देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.आज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत बंदची रुपारेष आखण्यात आली असून,मुंबईत एक सायकलही चालून देणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पवार यांनी सांगितले.उद्या आशियातील सर्वात मोठी  नवी मुंबई  कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारही बंद राहणार आहेत.उद्याचा बंद हा शांततेत पार पडावा अशी इच्छा आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.मात्र उद्याचे मुंबईतील हे आंदोलन शांततेतील शेवटचे आंदोलन असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान,शाळा आणि महाविद्यालये सुरु ठेवावीत की नाहीत याबाबत या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये एकमत झाले नसल्याची  माहिती मिळत आहे. मात्र या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा,दूध,दुकाने,शाळा,महाविद्यालये, स्कूल बस सूरु असतील अशी माहितीही पवार यांनी दिली.आतापर्यंत सरकारच्या अनेक आवाहनाला मराठा क्रांती मोर्चाने साथ दिली आहे. सरकारनेही मराठा समाजाचा योग्य सन्मान करावा.मात्र मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.तसेच आगामी काळातील ७२ हजार पदांच्या निवडीची प्रक्रिया आरक्षण मिळेपर्यंत थांबवावी अशी मागणीही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली.

 

Previous articleऔरंगाबाद येथील दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा कारणीभूत : जयंत पाटील
Next articleआंदोलनाला हिंसक वळण लागण्यास मुख्यमंत्री जबाबदार