“ते” ट्विट बनावट, त्यावर विश्वास ठेवू नका !
मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मध्ये पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना आज बुधवारी सुट्टी जाहीर केल्याचे विनोद तावडे यांचे ट्विट समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. मात्र, हे ट्विट बनावट असून, बंद संदर्भात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत, तेथील स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून निर्णय घेईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज बुधवारी मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. यातून शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे.
मात्र आज शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याचे विनोद तावडे यांचे ट्विट समाज माध्यमांवर व्हायरल झाले. हे ट्विट बनावट असून अशा ट्विटवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
मराठा समाजाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले आहे.