सांगली आणि जळगाव मध्ये उद्या भाजपाची अग्नीपरिक्षा
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या सांगली- मिरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. यापूर्वी झालेल्या निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे.तर सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठिकाणी होत असलेल्या निवडणूकीत भाजपला किती यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली- मिरज- कुपवाड व जळगाव या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.3३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण १५३ जागांसाठी ७५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.दोन्ही ठिकाणी एकूण ७ लाख ८९ हजार २५१ मतदारांसाठी१ हजार १३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ५ हजार ७५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आला आहे.