रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार

रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार

मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढविणारे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेतला असून येणारी २०१९ ची लोकसभेची निवडणूक त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातुन लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

रामदास आठवले सध्या  भाजपच्या कोट्यातुन राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. या पूर्वी त्यांनी एकत्रित रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईतील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती या निवडणुकीत त्यांना चांगली मते मिळाली असली तरी या निवडणुकीत त्यांचा पराभव  झाला होता.

पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून आठवले हे दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.तसेच पंढरपूर लोकसभा  मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातुन निवडणुक लढविली होती परंतु या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. १९९८ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते तेंव्हा आठवले हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात चेंबूर अणुशक्ती नगर; धारावी;नायगाव आणि वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले असणारे विधानसभा मतदारसंघ आहेत.या भागात  आठवले यांच्या  नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाची ताकद बऱ्यापैकी
आहे. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ सुरक्षित मतदारसंघ असल्यानेच आठवले या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Previous articleसांगली आणि जळगाव मध्ये उद्या भाजपाची अग्नीपरिक्षा
Next articleबीडच्या महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न