आण्णासाहेब पाटील महामंडळ यापुढे केवळ मराठा समाजासाठीच असणार

आण्णासाहेब पाटील महामंडळ यापुढे केवळ मराठा समाजासाठीच असणार
आ. मेटे यांची माहिती.
मुंबई दि. ६ : आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या नावातील मागास शब्द वगळण्यात येवून त्या ऐवजी या महामंडळाचे नाव आण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळ असे करण्यात येणार येवून त्याचा अध्यादेश आठ दिवसात काढण्यात येणार आहे. हे महामंडळ केवळ मराठा समाजासाठीच असेल अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी दिली आहे.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी आणि आत्महत्यांसारखे किंवा हिंसक पध्दतीने होणारे आंदोलन थांबावेत या करीता शिवसंग्राम संघटनेच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्याची वर्षा निवास स्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेची माहिती देताना आ. मेटे म्हणाले की, मराठा समाजाच्या आर्थिक विकासाच्या हेतूने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असल्याने अन्य समाजाच्या लोकांकडून या महामंडळात अर्ज केले जातात आणि मराठा समाजाच्या तरूणांच्या प्रकरणांना त्यामुळे विलंब होतो. त्यामुळे या महामंडळाच्या नावात मराठा असा उल्लेख करावा आणि केवळ मराठा समाजाच्या आर्थिक विकासाचे काम या मंडळातून केले जावे अशी शिवसंग्रामची मागणी होती. ती मान्य करण्यात आली असून येत्या आठ दिवसांत त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे मेटे म्हणाले. मराठा समाजाच्या तरूणांनी चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून आंदोलन करावे. मात्र हिंसा आणि आत्महत्या करून हा प्रश्न मिटणारा नसल्याने समाजाने संयम बाळगावा असेही आवाहन त्यानी केले आहे. शिवसंग्राम गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. असे सांगून ते म्हणाले की, हे आरक्षण सनदशीर मार्गाने मिळवण्याचा समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र त्यासाठी कायद्याच्या आणि घटनेच्या चाकोरीतून जावे आणि मराठा समाजाच्या शांतीप्रिय आणि शिस्तप्रिय लौकीकाला बट्टा लागणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे ते म्हणाले.
तरूणांनी आत्महत्या करू नये, प्रश्न हे चर्चेतुन संवादातून सुटू शकतो असे आवाहन करीत मराठा मोर्चाने सामुहिक नेतृत्व पुढे यावे आणि सरकारशी चर्चा करावी असेही आ. मेटे म्हणाले.
Previous articleघोषणा करणे आणि घोषणांना स्थगिती देणे हेच मुख्यमंत्र्यांचे काम
Next article१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर