नितीन गडकरी यांच्या कबुलीमुळे बेरोजगारीवर शिक्कामोर्तब

नितीन गडकरी यांच्या कबुलीमुळे बेरोजगारीवर शिक्कामोर्तब

खा. अशोक चव्हाण

मुंबई : देशात नोक-याच उपलब्ध नाहीत, अशी जाहीर कबुली देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवर शिक्कामोर्तब केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेस पक्षाने वारंवार हा मुद्दा उपस्थित केला. मात्र सरकारने धादांत खोटी आकडेवारी देऊन रोजगारनिर्मितीबाबत देशाची दिशाभूल केली. आता नितीन गडकरी यांनीच नोकऱ्या कुठे आहेत? असा सवाल करून सरकारचा खोटेपणा चव्हाट्यावर आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच गडकरी यांच्या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे,अशी मागणी चव्हाण यांनी केली.

एकिकडे नितीन गडकरी नोकऱ्या नाहीत असे सांगतात. तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुमारे २४ लाख पदे रिक्त आहेत. यावरून सरकारने नोकरभरती थांबवून कंत्राटी पध्दत राबवण्यास सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे. एकिकडे सरकारी नोकरभरती होत नाही. दुसरीकडे मोदी सरकारची चुकीची धोरणे आणि नोटाबंदीच्या अविचारी निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. देशातील बेरोजगारांनी याविरूद्ध आक्रोश केला असता पंतप्रधान त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला देतात, अशी बोचरी टीकाही चव्हाण यांनी केली.

Previous article१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर 
Next articleसरकारने समंजस्यपणाची भुमिका आधीच घेतली असती तर परिस्थिती बिघडली नसती