महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना‘भारतरत्न’साठी केंद्राकडे शिफारस

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना‘भारतरत्न’साठी केंद्राकडे शिफारस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

इतर मागास वर्गातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ओबीसी महामंडळास येत्या दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० कोटी रुपये देण्यात येतील. तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षणातील कोट्याप्रमाणे जागा भरल्या नसतील,तर त्या भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने वरळी येथील एनएससीआय येथे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यावेळी ते बोलत होते.

सत्तेत आल्यानंतर राज्य शासनाने नवीन ओबीसी मंत्रालयाची स्थापना केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इतर मागास वर्गासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व देण्याचा राज्य शासन आणि केंद्र शासन प्रयत्न करत आहे. ओबीसीसाठीच्या राष्ट्रीय मागास आयोगाला संविधानिक दर्जा देण्याच्या घटना दुरुस्तीला कालच संसदेने मान्यता दिली आहे. सत्तर वर्षानंतर केंद्र शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात इतर मागास वर्गाला आरक्षणातील कोट्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले की नाही, याची माहिती जाहीर करण्यात येईल. तसेच आरक्षणातील कोट्याप्रमाणे जागा भरल्या नसतील तर त्या भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल. तसेच ओबीसी समाजाच्या जागा त्या समाजालाच मिळतील.

इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथे लवकरच वसतीगृह सुरू करणार आहे. लवकरच राज्यातील २९ जिल्ह्यात वसतीगृह उभारण्यात येणार असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात लवकरच ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करणार असून केंद्र शासनाशी संबंधित विषयावर शिष्टमंडळाबरोबरच मी स्वतः केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. इतर मागास वर्गातील नॉन क्रिमिलेअर ही संकल्पना रद्द करण्यासाठी मागास आयोगाला सांगितले आहे. इतर मागास वर्ग महामंडळाच्यामार्फत नवीन योजना सुरू करण्यात येतील. तसेच बारा बलुतेदारांच्या पारंपरिक व्यवसायांना मदत केली जाईल. ओबीसी समाजाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Previous articleराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १४ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मिळणार
Next articleपाच वर्षात एकाही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या पक्षांची नोंदणी रद्द होणार