मोदी सरकारविरोधात चले जाव आंदोलन करण्याची गरज

मोदी सरकारविरोधात चले जाव आंदोलन करण्याची गरज

मुंबई : स्वातंत्र्यलढ्याला विरोध करून ब्रिटीशांची चापलुसी करणा-यांचे अनुयायी आज सत्तेवर बसून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील लढाईप्रमाणेच आजच्या सरकारविरोधात ‘चले जाव’ ची लढाई लढावी लागेल. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले व त्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, आजचा दिवस स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणा-या तमाम क्रांतीवीरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. ऑगस्ट क्रांतीचा लढा आपल्या सर्वांना प्रेरणा व शक्ती देणारा आहे. महात्मा गांधी यांनी‘चले जाव’ आंदोलनाची हाक दिली.जात, धर्म, पंथ विसरून देशातील गरीब, श्रीमंत असे सर्व वर्गातील लोक या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाने देशाला राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही मुल्ये दिली. त्यावेळी या आंदोलनाला विरोध करून ब्रिटिशांची चापलुसी करणा-यांचे अनुयायी आज सत्तेवर बसून ही मुल्ये संपवण्याचा प्रयत्न करित आहेत.भाजप सरकारने पुन्हा पारतंत्र्यांसारखी परिस्थिती आणली आहे.

देशात ४५ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव नाही म्हणून शेतकरी शेतमाल, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकतायेत. आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरात आणि राज्यात विविध समाजाचे लोक रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत. महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात आहे. लोकांनी काय खायचे? कोणते कपडे वापरायचे? यावर बंधने आणली जात आहेत. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. गोरक्षणाच्या नावाखाली दलित,अल्पसंख्यांक समाजातील निष्पाप लोकांच्या कत्तली केल्या जात आहेत. जमावाकडून निष्पाप लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळवत ठेवून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी इतर समाजाच्या नेत्यांना याबाबत विश्वासात घ्यावे व परस्पर सामंजस्याने सरकारचा कुटील डाव हाणून पाडावा. समाजविघातक प्रवृत्तींना चले जाव असे सांगण्याचा संकल्प करून शांतता,अहिंसा, सत्याग्रह, धर्मनिरपेक्ष लोकशाही या मुद्दयांवर अढळ निष्ठा ठेवून त्यासाठी अधिक कटिबध्द होण्याचा आजचा दिवस आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

यानंतर राष्ट्रीय एकात्मता व सद्भावनेसाठी ऑगस्ट क्रांती मैदान ते मणीभवन असा तिरंगा मार्च काढण्यात आला व मणीभवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून या मार्चची सांगता झाली

Previous articleठोस आश्वासनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे
Next articleअभिनेत्री सुलोचना यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करावे