अभिनेत्री सुलोचना यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करावे

अभिनेत्री सुलोचना यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करावे

छगन भुजबळ यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

मुंबई  : भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना केंद्र सरकारच्या दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आ. छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री श्रीमती सुलोचना दीदी लाटकर यांनी वयाच्या नव्वदीत पदार्पण केले आहे. सुलोचना दीदी या भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भाग बनून राहिल्या आहेत. ४०० हून अधिक हिंदी- मराठी आणि इतर भाषातील सिनेमात त्यांनी कसदार व सशक्त भूमिका साकारलेल्या आहेत. सरस्वतीचंद्र , कोरा कागज ,मुकद्दर का सिकंदर या गाजलेल्या हिंदी सिनेमांमधून त्यांनी प्रेमळ आईची भूमिका साकारलेली आहे. तर मीठ भाकरी , साधी माणस , सांगत्ये ऐका ,मोलकरीन आणि मराठा तितुका मेळवावा या मराठी चित्रपटांमधून त्यांनी अतिशय दमदार भूमिका केलेल्या आहेत.

कृष्णधवल चित्रपटांच्या जमान्यापासून अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत मराठी आणि हिंदी पडद्यावर झळकणारे मराठमोळे नांव म्हणजे सुलोचनादीदी. चित्रपटसृष्टीतील गाढा अभ्यास आणि अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाचा आणि कामगिरीचा उल्लेख केल्याशिवाय चित्रपटसृष्टीची वाटचाल अधुरीच राहते. त्यांना यापूर्वी पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण हे सन्मान मिळालेले आहेत. त्याचबरोबर फिल्मफेअरचा लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये आपले अवघे आयुष्य खर्ची घालूनही त्यांना अद्याप केंद्र शासनाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सुलोचना दीदी यांचे चित्रपटसृष्टीमध्ये ७५ वर्षांचे योगदान दिलेले आहे. रुपेरी पडदा हेच त्यांचे आयुष्य आणि अभिनय हाच त्यांचा श्वास बनलेला आहे. सुलोचनादीदी ह्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमधील श्रद्धास्थान आहे. तरी चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात यावे अशी मागणी भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Previous articleमोदी सरकारविरोधात चले जाव आंदोलन करण्याची गरज
Next articleहिंसाचार करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल करा