हिंसाचार करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल करा

हिंसाचार करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल करा

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते.यामध्ये मोठ्या प्रमाणात एसटी आणि खाजगी वाहनांचे नुकसान झाले होते.या झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून, हिंसाचार करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी या याचिकेत  करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली आहेत. महाराष्ट्र बंद वेळी अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनात हिंसक कृत्ये करणाऱ्यांना शोधून काढावे. अशा मोर्चांवर बंदी घालण्यात येवून हिंसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी द्वारकानाथ पाटील या शेतकऱ्याने या याचिकेद्वारे केली आहे. याचिकाकर्त्यांचे वकिल आशिष गिरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत ही मागणी केली आहे. १३ ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मराठा मोर्चाकडून बंद पुकारण्यात आला असला तरी हे हिंसाचार करणारे कोण आहेत असा प्रश्न उपस्थित करत हिंसाचार करणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. २००३ मध्ये शिवसेना-भाजपाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यावेळी कायद्यानुसार या दोन्ही पक्षांना २५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता.याचा आधार घेत सध्या सुरू असणा-या मोर्चांना रोखता येऊ शकते असे अॅड. गिरी यांनी सांगितले.

Previous articleअभिनेत्री सुलोचना यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करावे
Next articleबकरी ईदला राज्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरवाद्यांचा कट!