काँग्रेस समविचारी पक्षांची महाआघाडी करून निवडणूका लढणार
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून इतर लवकरच समविचारी पक्षांशी चर्चा करून महाआघाडीचा निर्णय घेऊ अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.
आज टिळक भवन दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन समाज पक्ष, भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पक्ष (गवई) व अन्य धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच या पक्षांच्या नेतृत्वाशी आघाडीबाबत चर्चा करण्यात येईल असे चव्हाण म्हणाले.
या बैठकीला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार नसीम खान, अमरीश पटेल, सतेज पाटील इत्यादी नेते उपस्थित होते.