राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी सुरू करण्याची आ. प्रवीण दरेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : राज्य सहकारी संघाचा शिक्षणनिधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आपल्याला वेतन मिळावे आणि राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्वीप्रमाणे सुरू करावा , अशी मागणी करत राज्य सहकारी संघाचे कर्मचारी गेली दीड महिना सहकार आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषण करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी आमदार व राज्य संघाचे तज्ञ संचालक आमदार प्रवीण दरेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच त्यांना लवकरात लवकर शिक्षण निधी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री व सहकार आयुक्तांची भेट घेऊन न्याय मिळवून देऊ, असे सांगितले होते. त्यांनंतर, सहकार आयुक्त कार्यालयात झालेल्या शासनाच्या कमिटीच्या बैठकीत आमदार दरेकर यांनी आग्रही भूमिका मांडली व शासनाला शिफारस करण्याचे या समितीत ठरले.
आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्य सहकारी संघाच्या कर्मचाऱ्यांना वेतन व मिळाल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे यांनी विधिमंडळाच्या लक्षात यापूर्वीही आणून दिले होते. तसेच त्यांना शिक्षण निधी देण्याची मागणीही विधान परिषदेत केली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, या विषयावर उपाययोजना करण्यासाठी सहकार अतिरिक्त आयुक्त तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आहे.
आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन कर्मचा-यांच्या आंदोलनाची कल्पना दिली व त्यांच्या पगारकरिता तात्काळ निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आग्रहाने सांगितले.मुख्यमंत्रयांनी तात्काळ राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा संपर्क साधून कॅबिनेट करिता सदर विषय घेण्याची सूचना दिली. त्यामुळे आता राज्य सहकारी संघाच्या कर्मचाऱ्यांचा पगार व शिक्षण निधीचा विषय मार्गी लागण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आले.राज्याचे मुख्यमंत्री हे याबाबत सकारात्मक असून ते व सहकार मंत्री राज्य संघाला न्याय देतील. तसेच सहकार चळवळीच्या शिक्षण प्रशिक्षण या विषयाला बळकटी मिळेल, असा विश्वास आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.