मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर हलक्या वाहनांना एक महिना टोलमाफी

मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर हलक्या वाहनांना एक महिना टोलमाफी

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची उपाययोजना

मुंबई : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय म्हणून ऐरोली, तसेच मुलुंडचे दोन्ही टोलनाके, अशा तीन टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी एक महिना वसुली स्थगित ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या संयुक्त बैठकीत घेतला. यामुळे २१ ऑगस्टपासून या तीन टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना एक महिना टोल भरावा लागणार नाही. टोलनाक्यांवरील कोंडी फोडण्यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून मुलुंड टोलनाक्यावर बूथची संख्या वाढवण्यासाठी उन्नत रस्ता करून डबलडेकर टोल नाका उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही या बैठकीत टोल वसुली करणाऱ्या एमईपी कंपनीला देण्यात आले.

मुंब्रा बायपासची दुरुस्ती सुरू असल्यामुळे नवी मुंबईकडून येणारी सर्व वाहने ऐरोलीमार्गे मुलुंडहून ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गाने नाशिक आणि अहमदाबादच्या दिशेने जात आहेत, तसेच या दोन ठिकाणांहून येणारी वाहतूकही याच मार्गे नवी मुंबईला जात असल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर आणि विशेषतः टोल नाक्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. मुंब्रा बायपास कुठल्याही परिस्थितीत १० सप्टेंबर पर्यंत सुरू करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काही दिवसांपूर्वी दिले. मात्र, तातडीचा उपाय म्हणून मुलुंडचे दोन्ही टोल नाके आणि ऐरोली अशा तीन टोल नाक्यांवर हलक्या वाहनांच्या टोल वसुलीला एक महिना स्थगिती देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमईपीचे वीरेंद्र म्हैसकर उपस्थित होते.

वाहतूक कोंडीवर तातडीचा उपाय म्हणून एक महिना टोल वसुलीला स्थगिती देण्याशिवाय पर्याय नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. त्यानुसार हलक्या वाहनांच्या टोल वसुलीस ऐरोली आणि मुलुंडचे दोन अशा तीन टोलनाक्यांवर २३ सप्टेंबर पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

Previous articleसनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करा
Next article‘सनातन’ची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेने वेळीच जागे व्हावे