‘सनातन’ची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेने वेळीच जागे व्हावे
नवाब मलिक
मुंबई : अनेक घटनांमध्ये सनातन संस्थेचे कार्यकर्ते सामील असल्याचे निष्पन्न होवून त्यांच्याकडे स्फोटकेही सापडली आहेत. काहींना अटकही झाली होती. त्यावेळी शिवसेनेने सनातन संस्थेची पाठराखण केली होती .त्यामुळे आता तरी शिवसेनेने जागे व्हावे आणि सनातनची पाठराखण करणे थांबवावे नाही तर शिवसेनेचे असे अनेक लोक त्यांच्या या प्रकाराला बळी पडतील.असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला दिला आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना नालासोपारा स्फोटके प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला अटक झाल्यामुळे शिवसेनेचे असे आणखी बळी जाण्याअगोदर शिवसेनेने सावध व्हावे असा सबुरीचा सल्ला देतानाच शिवसेना सनातन संस्थेची कशी पाठराखण करत होती हे मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
महाराष्ट्र एटीएसकडून अटक सत्र सुरु आहे त्यामध्ये नालासोपारातील वैभव राऊत याच्या घरातून बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, श्रीकांत पांगारकर, सचिन अंदुरे यांना अटक करण्यात आली आहे आणि यामधून नरेंद्र दाभोळकरांचा सचिन अंदुरे हा मारेकरी सापडला आहे असेही मलिक म्हणाले.
कर्नाटक सरकारला पत्रकार गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्येच्या तपासामध्ये दुवा मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एटीएसला ही सगळी माहिती पुरवली. त्यापध्दतीने महाराष्ट्र एटीएसने पुढच्या कारवाया सुरु केल्यानंतर ही सगळी प्रकरणे उघडकीस येत आहेत. पोलिसांना सुगावा मिळाल्यानंतर ते योग्य रितीने तपास करीत आहेत. त्यांच्याकडे बोट दाखवणे योग्य नाही. असे सांगतानाच या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण याचा छडा लावल्याशिवाय हे प्रकरण उघड झाले असे बोलता येत नाही असेही मलिक म्हणाले.