मंत्री गिरीष महाजनांसह १०० जणांचे वैद्यकीय पथक केरळ मध्ये

मंत्री गिरीष महाजनांसह १०० जणांचे वैद्यकीय पथक केरळ मध्ये

मुंबई : केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीने बाधित पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने जीवनावश्यक वस्तू, कपडे आदी साहित्य केरळला कालच रवाना केले असतानाच, केरळमधिल पूरग्रस्त जनतेला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० जणांचे वैद्यकीय पथक विविध आजारांशी संबंधित तसेच प्रतिबंधात्मक गोळ्या-औषधांसह केरळ मध्ये दाखल झाले आहे.

केरळमधिल अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० जणांचे वैद्यकीय पथक आवश्यक गोळ्या-औषधांसह भारतीय वायूसेनेच्या दोन विशेष विमानांनी आज केरळमध्ये दाखल झाले.या वैद्यकीय पथकामध्ये जे. जे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५० तर, ससून रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गजानन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली २६ वैद्यकीय अधिकारी त्याशिवाय  इतर स्वयंसेवक-सहायकांसह १०० जण सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातर्फे २० कोटी रुपये केरळच्या पूरग्रस्तांसाठी यापूर्वीच जाहीर केले असून अन्नधान्य, कपडे आणि अत्यावश्यक साहित्य केरळकडे रवाना केले आहे, यासाठी मंत्रालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

केरळमध्ये पुरामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता केरळच्या जनतेला मदत करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पुरवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे. केवळ नाममात्र आरोग्य सेवा न पुरविता सर्जरी, मेडिसीन, बालरोग, स्त्रीरोग, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसीनच्या तज्ज्ञांचा या पथकात समावेश करण्यात आला असून आवश्यक ती सर्व औषधे, गोळ्या, सलाईन्स आणि सामग्री या पथकासोबत देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पुन्हा दुसरे वैद्यकीय पथक केरळमध्ये येत्या दोन-तीन दिवसात पाठविण्यात येईल आणि केरळमध्ये दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे काम हे वैद्यकीय पथक करेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी केरळला रवाना होण्यापूर्वी सांगितले.

Previous articleसरकारविरोधात काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा
Next articleनीरव मोदीसह बड्या उद्योगपतींचे अलिबाग मधिल बंगले जमीनदोस्त करणार