दाभोळकर,पानसरे हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधाराचा शोध घ्या
जयंत पाटील यांची मागणी
मुंबई : दाभोळकर,पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला.त्यामागील सूत्रधार कोण आहे याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या खोलापर्यंत पोचावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास पाच वर्षे लावता आला नाही. गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येतील आरोपी सापडल्यानंतर आणि शेजारच्या राज्याने माहिती पुरवल्यानंतर मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे. पाच वर्षात महाराष्ट्र पोलिसांना या खून सत्राचे धागेदोरे का सापडले नाहीत असा सवालही पाटील यांनी केला.
शेजारच्या राज्यातील पोलिसांनी सहकार्य केले म्हणून दाभोळकर यांचा मारेकरी सापडला आहे. सनातन संस्था यामागे आहे. त्यांच्यापर्यंत सरकारने पोचावे आणि सरकारने पुढचा तपास पारदर्शी करावा असेही पाटील म्हणाले.
सनातनवर बंदी आणावी असा प्रस्ताव केंद्राकडे अगोदरच करण्यात आलेला आहे. परंतु त्यावेळी सनातन एवढया हत्या करु शकते हे माहित नव्हते. दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर सनातनकडे लक्ष गेले आहे. पण आता विचारवंतांच्या हत्येत यांच्या नावाचा समावेश दिसत आहे. मालेगावच्या बॉम्बस्फोटातील लोकांना करकरे यांनी पकडले होते आता ते आरोपी सुटले होते. मग बॉम्बस्फोट घडवणारे आरोपी कोण होते अशी शंका आता व्यक्त होत आहे. डॉ.दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येची निरपेक्ष, पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी. या गुन्ह्यात मदत करणारे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणारे सगळ्यांपर्यंत सरकारने पोहोचायला हवे असेही पाटील म्हणाले.
शेजारच्या राज्यात झालेल्या हत्येनंतर आरोपी पकडले जातात पण पाच वर्षे दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी पकडले जात नाही याचा अर्थ शेजारच्या राज्यातील पोलिसांना जे जमले ते आपल्या पोलिसांना शक्य झाले नाही.त्यामुळे सनातनी विचारांच्या लोकांची पाळेमुळे सरकारने खणून काढली पाहिजे अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.गोरक्षकांना रोजगार देण्याबाबतच प्रश्न विचारला असता मध्यंतरी गोरक्षणाच्या नावाखाली समाजात अशांतता माजवण्याचे काम केले गेले. अल्पसंख्याक समाजातील लोकांची गोरक्षणाच्या नावावर हत्या करण्यात आली. तुम्हाला हवे तर गोशाळा बांधा पण गोरक्षकांना रोजगार देणे योग्य वाटत नाही असे स्पष्ट करतानाच गोरक्षकांची नेमकी व्याख्या काय असा सवाल करताना हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटण्याचा हा कार्यक्रम असल्याचा आरोप पाटील यांनी केला आणि गोरक्षक नेमण्यापेक्षा गोसेवक बनवावे अशी मागणी त्यांनी केली.