अटलजींना आदरांजली वाहण्यासाठी उद्या मुंबईत श्रद्धांजली सभा

अटलजींना आदरांजली वाहण्यासाठी उद्या मुंबईत श्रद्धांजली सभा

राज्यात विविध नद्यांमध्ये अस्थी विसर्जन

मुंबई : माजी पंतप्रधान, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे महान नेते, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या बुधवार मुंबईत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे नवी दिल्ली येथून अटलजींचा अस्थी कलश मुंबईत आणणार असून राज्यातील विविध नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत नरिमन पॉइंट येथे एनसीपीए सभागृहात सायंकाळी ६ वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह नेते अटलजींविषयीच्या भावना व्यक्त करतील. विविध क्षेत्रातील मान्यवरही सभेत सहभागी होतील. मुंबईतील राज्यस्तरीय सभेप्रमाणे राज्यात विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार अटलजींचा अस्थी कलश नवी दिल्ली येथून आणणार आहेत. बुधवारी दुपारी चार वाजता अटलजींचा अस्थी कलश मुंबईत विमानतळावर आणण्यात येईल.

महाराष्ट्रातील विविध नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथे नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येईल. मुंबईत श्रद्धांजली सभास्थानी अस्थी कलश हस्तांतरित करण्यात येतील. अटलजींचा अस्थी कलश विसर्जनासाठी घेऊन जात असताना नागरिक व कार्यकर्ते वाटेत ठिकठिकाणी पुष्पांजली अर्पण करतील. राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिका , नगरपंचायत,जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तसेच अन्य संस्था, मंडळे व महामंडळांमध्ये अटलजींनाश्रद्धांजली वाहणारे शोक प्रस्ताव मंजूर करण्यात येतील.अटलजींचे साहित्य व विचार याविषयी पीएच. डी.साठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची पाठ्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येईल. राज्यातील सर्व तेरा विद्यापीठांमध्ये अटलजी विचार अध्यासन सुरू करण्यात येईल व त्यासाठी राज्य सरकार वीस कोटी रुपयांची तरतूद करेल, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली.

Previous articleदाभोळकर,पानसरे हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधाराचा शोध घ्या
Next articleराधाकृष्ण विखे पाटील यांनाच अटक करा