राधाकृष्ण विखे पाटील यांनाच अटक करा

राधाकृष्ण विखे पाटील यांनाच अटक करा

सनातन संस्थेची मागणी

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सनातनवर बंदी घालून ‘सनातनचे प्रमुख डाॅ. जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी केली होती.या मागणी नंतर आता सनातन संस्थेने राधाकृष्ण विखे पाटील यांनाच अटक करावी अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांची मागणी ही स्वतःची कातडी बचाव करण्यासाठी सनातनला लक्ष्य करण्यासारखी आहे. सनातन संस्थेने २०१५ आणि २०१८ मध्ये विखे-पाटलांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड केली. दुर्दैवाने भाजप शासनानेही अद्याप यावर काहीही कारवाई केली नाही. याचाच सूड घेण्याच्या भावनेतून विखे पाटलांची ही धडपड चालू आहे. सनातन संस्थेच्या प्रमुखांना अटक करा, अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला उरलेला नाही असे चेतन राजहंस यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ज्या पक्षातील महासचिव आतंकवादी डॉ. झाकीर नाईकची गळाभेट घेऊन त्यांच्या व्यासपीठावर जातात, डॉ. झाकीरकडून ५० लाखांची मदत काँग्रेसला केली जाते, पंजाबमधील काँग्रेसी मंत्री नवज्योतसिंग सिध्दू भारतावर आक्रमण करणार्‍या पाकिस्तानी सैन्य प्रमुखांची गळाभेट घेतात, पाकिस्तानात जाऊन भारतातील शासन बदलण्याची मागणी करणार्‍या मणिशंकर अय्यरांची जी काँग्रेस ‘घरवापसी’ करून घेते, नुकतेच मणिपूर काँग्रेस आमदाराच्या घरी पोलीस मुख्यालयातून चोरीला गेलेली शस्त्रास्त्रे सापडली, बोफोर्सपासून आदर्श-खाण घोटाळ्यापर्यंत ज्या काँग्रेसचे मंत्री भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत अशा काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी किंवा तत्कालीन प्रमुख सोनिया गांधी यांना धरावे आणि त्यांना अटक करावी, अशी जर कोणी मागणी केली, तर ती जेवढी हास्यास्पद ठरेल, तेवढीच हास्यास्पद आणि बालीश मागणी राधाकृष्ण विखे पाटील करत आहेत, अशी टीका सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केली आहे.

दाभोलकर हत्येचा तपास चालू होण्याआधीच ज्या पृथ्वीराज चव्हाणांनी या हत्येमागे उजव्या विचारसरणीचा हात आहे, अशी आवई उठवून तपास भरकटवला. त्यांचेच भाऊबंद असलेले विखे पाटील हेही स्वतःची पापे झाकण्यासाठी सनातनवर बंदीसाठी थयथयाट करत आहेत. त्यासाठी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या काँग्रेसी तत्त्वानुसार सनातनवर खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे सनातनवर बंदी येईल कि नाही, हे काळ ठरवेल; पण विखेपाटलांना तुरुंगाची हवा खाण्यासाठी सनातनचा सिंहाचा वाटा नक्की असेल असेही राजहंस यांनी म्हटले आहे.

Previous articleअटलजींना आदरांजली वाहण्यासाठी उद्या मुंबईत श्रद्धांजली सभा
Next articleमुंबईतील आमदारांची सभागृहातील कामगिरी घटली