काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन
मुंबई : माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. दिल्लीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते.
गुरुदास कामत हे अहमद पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. अहमद पटेल यांना शुभेच्छा देवून ते हाॅटेल मध्ये परतले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला.त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.कामत यांच्या निधनाने मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.मुंबईसह पश्चिम उपनगरात काँग्रेसला उभारी देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या जवळचे असणा-या कामत यांनी गेल्या वर्षी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.नाराजी दूर झाल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय झाले होते.
कामत यांनी १९७२ मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६ मध्ये त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपद भूषवले. १९८४ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. यूपीएच्या कार्यकाळात २००९ ते २०११ या कालावधीत ते केंद्रीय राज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला होता.