अखेर लोअर परेल येथील पुलाचा तिढा सुटला

अखेर लोअर परेल येथील पुलाचा तिढा सुटला

महापालिकेच्‍या हद्दितील काम पालिका तर रेल्‍वे हद्दितील काम रेल्‍वे करणार

मुंबई : लोअर परेल येथील पुलाचा आराखडा रेल्‍वे तयार करणार असून जो भाग पालिकेच्‍या हद्दित येतो त्‍याचे बांधकाम महानगरपालिका करेल तर रेल्‍वे हद्दितील काम रेल्‍वे करेल, असे सष्‍ट करीत रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांच्‍या उपस्थितीत हा तिढा अखेर सुटला आहे.

लोअर परेल येथील धोकादायक पुल पाडण्‍याचे काम सुरू असून हा पुल नेमका कुणी बांधावा याबाबत पालिका आणि रेल्‍वे मध्‍ये तू-तू मै- मै सुरू होती. मुंबई भेटीवर असलेल्‍या रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांची आज आ.आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने भेट घेतली. हा पुल वाहतूकीच्‍या दुष्‍टीने महत्‍वाचा असल्‍यामुळे त्‍याचा निर्णय तातडीने व्‍हावा अशी विनंती रेल्‍वे मंत्र्यांना केली.आज झालेल्‍या संयुक्‍त बैठकीतनंतर या पुलाचा संपुर्ण आराखडा रेल्‍वे तयार करणार असून महापालिकेच्‍या हद्दितील पुलाचे काम महापालिका करणार असून रेल्‍वेच्‍या हद्दितील पुलाचे बांधकाम रेल्‍वे करणार आहे. त्‍यामुळे या पुलावरून तयार झालेला तिढा अखेर सुटला आहे.

नव्याने रेल्वे लाईन टाकण्याची कामे तातडीने पूर्ण करा -मुख्यमंत्री

रेल्वे मंत्रालयाने राज्यातील अनेक प्रकल्पांना मंजूरी दिली असून त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया, नव्याने रेल्वे लाईन टाकण्याची कामे आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मलबार हिल परिसरातील सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्यात सुरु असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांबाबत आढावा बैठक आज झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील अनेक मार्गावर नव्याने रेल्वे लाईन टाकण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. त्यासाठी सिडको, मुंबई विकास प्राधिकरण आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हा प्रश्न निकाली काढावा. सीएसटी- पनवेल, चर्चगेट-विरार कॉरिडॉर मार्ग, विविध स्थानकांतील इलेव्हेटडे कॉरिडॉरची कामे,हायस्पिड रेल्वे, ओव्हर ब्रिजेस, रेल्वे स्टेशनवरील सोयीसुविधा तसेच इन्टीग्रेटेड टिकेटिंग सिस्टिम सुरु करण्यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकांऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

याच आढावा बैठकीत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सादर केलेल्या सादरीकरणातून मुंबई शहर व परिसरातील सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या प्रत्येक प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती रेल्वेमंत्री पियुष  गोयल यांनी घेतली व चालू वर्षासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेले प्रकलप पूर्णत्वास नेण्याच्या सूचना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-बल्लारशाह,कल्याण-कसारा, भुसावळ-जळगाव, पुणे-मिरज लोणावळा,मनमाड–जळगाव, वर्धा-नागपूर, गोरेगाव –बोरिवली, बोरिवली-विरार, कल्याण-आसनगांव कल्याण-बदलापूर, पनवेल-कर्जत,रोहा-वीर या मार्गावर दुसरी  आणि तिसरी रेल्वे लाईन टाकणे तसेच बेलापूर-सीवूड-उरण या नव्या रेल्वे कामाबाबतचे भूसंपादन, पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनन्स आणि घाटकोपर-उरण या १४.५ किलो मीटरच्या लांबीसाठी भूसंपादनाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु पी एस मदान , अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous articleएक हजार ग्रामपंचायतींसाठी येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान
Next articleसनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार