सनातन संस्थेवर बंदी घालण्यास वेळ लागणार
गृहराज्यमंत्री केसरकर यांचे सूतोवाच
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदींच्या हत्त्येमध्ये संशयित आरोपी पकडल्यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत असतानाच सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे सूतोवाच राज्याचे गृहराज्यमंत्री ( ग्रामिण) दीपक केसरकर यांनी केले आहे.
आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, कोणत्याही संस्थेविरूद्ध बंदी घालण्याची शिफारस करताना त्याची पूर्ण तयारी करावे लागते. तसेच प्रत्येक संस्थेला बंदीविरूद्ध न्यायालयात दाद मागता येत असल्यामुळे बंदीच्या समर्थनार्थ देण्यात येणारी कारणे परिपूर्ण असावी लागतात. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करण्यासाठी काही माहिती मिळाली आहे. मात्र ती माहिती पुरेशी नाही. यासाठी अधिकची माहिती मिळविण्याचे काम चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.
२०११ मध्ये आघाडी सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. त्यावर केंद्राने २०१३ साली काही प्रश्नांची विचारणा केली होती. यावर राज्य सरकारने २०१५ साली काही माहिती पाठविली होती. त्याचप्रमाणे हा प्रस्ताव परिपूर्ण करून केंद्राला सादर केला. आता परत त्यावर स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.औरंगाबाद आणि पुण्यात मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणावरून आत्महत्त्या झाल्याच्या वृत्ताची चौकशी केली जाईल. या प्रकरणात पीडित मुलींनी पोलिसांकडे तक्रार केली असेल आणि पोलिसांनी त्यावर कारवाई केली नसल्यास संबंधित पोलिसांवरही कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.