सरकारकडून घटना पायदळी तुडविण्याचे काम: छगन भुजबळ
नाशिक : जगात नव्याने निर्माण होणारे देश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अभ्यास करतात. या संविधानाने संपूर्ण भारत देश एकसंध बांधला गेला आहे. मात्र सद्याच्या सरकार कडून घटना पायदळी तुडविण्याचे काम केले जात असल्याची टीका करत ही घटना वाचण्याचे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी महिला विभागाकडून नाशिक येथे आयोजित ‘संविधान बचाव…देश बचाव’ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले की, मनुस्मृती मुळे हजारो वर्ष पददलित आणि महिलांवर अत्याचार होत होते. त्यासाठी महात्मा फुले यांनी त्या काळात आवाज उठविला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरू मानून मनुस्मृती नष्ट करून संविधानाची निर्मिती केली. संविधानात व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे मात्र संविधानातील ही तत्वे सद्याच्या व्यवस्थेकडून मोडीत काढले जात आहे. देश मागास राहण्यात मनूची वृत्ती कारणीभूत आहे. ही वृत्ती परत रुजविण्याचे काम सध्या केले जात आहे.
या अगोदर देशात विरोधी पक्षांचा सन्मान राखला जात होता. मात्र सध्याच्या सरकार कडून विरोधी पक्षाचा सन्मान न करता आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका करून आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी असून त्यांचे विचार रुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू असे त्यांनी सांगितले. एकीकडे मनुस्मृती जाळली म्हणून महिलांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र संविधान जाळले की कुठलाही गुन्हा दाखल होत नाही ही खेदाची बाब आहे. सद्याच्या व्यवस्थेकडून देशात जाती जाती मध्ये लढाया लावण्याचे काम होत आहे. भाजप सरकारने सांगिलते मेक इन इंडिया हे लोक घरातच बॉम्ब तयार करू लागले आहे. त्यामुळे सनातन सारख्या संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली.
देशातील आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. देशात साखरेचे मुबलक उत्पादन असतांना पाकिस्तानातुन साखर आयात केली जाते ही चुकीची बाब. शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढला की लगेच निर्यात बंद करण्याचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. सत्तेवर येण्यासाठी सरकारने जनतेला दिलेल्या विविध घोषणा दिल्या त्यांचे काय झाले ? किती लोकांना १५ लाख मिळाले ? नोट बंदीमुळे आतंगवाद संपतील ते संपले का ? वीज बिल कमी करणार होते ते झाले का ? असे अनेक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. व ईव्हीएम मशीन मते खाण्याचे काम करत असल्याची टीका करून मनुस्मृती बरोबरच ईव्हीएम ची होळी केली जात असल्याने महिलां पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, देशात संविधानिक मुद्यांना हरताळ फसण्याचे काम होत आहे. देशात दारिद्र्य कमी करण्याचे काम होत नाही. देशात महिला बालके सुरक्षित नाही. त्यामुळे संविधान वाचवण्याची गरज आहे. देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. सरकार विरोधी भूमिका घेतल्याने अनेक पत्रकारांना नोकरी गमवावी लागत आहे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात असल्याची टीका त्यांनी केली.
समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात आले मात्र आरक्षणावर गदा आणण्याचे काम सरकारकडून होत आहे. संविधान जाळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात महिलांना व्यवस्थेत आरक्षण देण्याचे काम शरद पवार यांनी केले. देशात अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रयत्न होत असतांना मनुवादी लोकांकडून अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले जात असल्याची टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, सनातनच्या लोकाकडे बॉम्ब सापडले त्यांनी कुणाच्या हत्येचा कट रचला होता त्याची माहिती पत्रकारांसमोर खुली करावी असे खुले आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले. कुठलेही आरोप सिद्ध झाले नसतांना भाजप सरकारने छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचे पाप त्यांनी केले. सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली. भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी संघटित होण्याची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.