माळी समाजातील तरुणांनी उद्योगाबरोबरच सरकारी पदांवर देखील पोहचावे

माळी समाजातील तरुणांनी उद्योगाबरोबरच सरकारी पदांवर देखील पोहचावे

छगन भुजबळ

नाशिक : महात्मा फुले यांनी बहुजन समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे माळी समाजातील तरुणांनी उद्योगाबरोबरच सरकारी पदांवर पोहचावे आणि माळी समाजाबरोबरच इतर समाजातील बहुजन समाजातील लोकांना पुढे नेण्याचे काम करावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते आज महात्मा फुले उद्योजक ग्रुप नाशिक यांनी आयोजित केलेल्या एकदिवसीय माळी उद्योजक मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, समाजातील उत्कर्ष करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना आपल्या पायावर खंबीरपणे उभे करणे गरजेचे आहे. माळी समाजाचा मूळ व्यवसाय हा फुले व शेतमालाचे उत्पादन व विक्री आहे. पण हळूहळू क्रांती होत गेली आणि बाराबलुतेदारी पद्धतीत बदल झाला.आणि कोणत्याही समाजाचा व्यक्ती जमेल तो व्यवसाय करू लागला.माळी समाजातील विविध उद्योग व्यवसायात केलेला विकास पाहून मनस्वी आनंद होत असल्याचे सांगितले. संत सावता माळी यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे समाजातील युवकांनी श्रमाला महत्व देऊन उद्योग व्यवसायात प्रगती करावी.समाजातील उद्योजकांनी कितीही अडचणी संकटे आले तरी खंबीर उभे राहून विविध उद्योग व्यवसायात यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी केले.

महात्मा फुले हे खरे उद्योजक होते. त्यांनी कात्रजचा डॅम बांधला त्यामुळे शेतकरी बारमाही शेती करू लागले. महात्मा जोतीराव फुले यांच्या अनुयायांनी टाईम्स ऑफ इंडिया, कापड गिरण्या, मुंबई महानगरपालिका इमारत बांधली होती. १५० वर्षांपूर्वीं त्यांनी उद्योगाचे शिक्षण द्यावी अशी मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केली. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण विद्यार्थी आज घेऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात ओबीसींची संख्या ५४ टक्के असतांना २७ टक्के आरक्षण मिळाले मात्र अद्यापही नोकऱ्यामध्ये ओबीसींना डावलण्यात येत असल्याची खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.

महात्मा फुले यांनी मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणले मात्र सद्याच्या व्यवस्थेत पुन्हा उलटे चक्र फिरविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील जे लोक उद्योग व्यवसायात प्रगती केली त्यांनी इतरांना मदतीचा हात देऊन उभे करावे, तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील उद्योजकाणीं प्रयत्न करावे असे आवाहन भुजबळ यांनी केले.

Previous articleडिजीटल इंडियात केबल मोफत मिळत असेल तर पेट्रोल डिझेल दूध फुकट द्या
Next articleकेरळ पूरग्रस्तांसाठी रामदास आठवलेंची २५ लाखाची मदत