ग्रामरचनेसाठी ज्ञानप्रधान युगाचा सेतू रचण्याची गरज : डाॅ. अनिल काकोडकर

ग्रामरचनेसाठी ज्ञानप्रधान युगाचा सेतू रचण्याची गरज : डाॅ. अनिल काकोडकर

लोणी : शेती प्रधान युगाकडुन सुरु झालेली आपल्‍या भारत देशाची वाटचाल आता ज्ञान प्रधान युगाकडे जात असुन यामध्‍ये उपलब्‍ध होणा-या संधी या खुप मोठ्या आहेत. नवीन ग्राम रचनेसाठी या ज्ञान प्रधान युगाचा सेतु निर्माण करण्‍यासाठी प्रवरा परिसराने आणखी एक पाऊल पुढे टाकावे अशी अपेक्षा भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्‍यक्ष पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर यांनी व्‍यक्‍त केली.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या ११८ व्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन आयोजित करण्‍यात आलेल्‍या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्‍कार वितरण आणि शेतकरी दिनाच्‍या समारंभात डॉ.अनिल काकोडकर यांनी ज्ञानावर आधारित नव्‍या ग्रामरचनेची संकल्‍पना विषद करुन, प्रवरा परिवाराने यापुर्वी डॉ.ए.पी.जे अब्‍दुल कलाम यांच्‍या मार्गदर्शनाखाली पुरा मॉडेल तयार केले होते. त्‍या आधारेच ज्ञानावर आधारित ग्रामरचनेचे नवीन मॉडेल तयार करण्‍याची महत्‍वपुर्ण सुचना केली.

संत साहित्‍याचे गाडे अभ्‍यासक डॉ.सदानंद मोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या या शानदार सोहळ्यास ९१ व्‍या साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ.लक्ष्‍मीकांत देशमुख,विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील, आ.भाऊसाहेब कांबळे, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जि.पच्‍या अध्‍यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे, प्रवरा मेडीकल ट्रस्‍टचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, श्रीरामपूरच्‍या नगराध्‍यक्षा अनुराधा आदिक, कोपरगावचे नगराध्‍यक्ष विजय वहाडणे, पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ.रावसाहेब कसबे आदि याप्रसंगी व्‍यासपीठावर उपस्थित होते.

साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ.लक्ष्‍मीकांत देशमुख यांच्‍यासह मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावर्षीचे साहित्‍य पुरस्‍कार वितरीत करण्‍यात आले. यावर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य सेवा जीवन गौरव पुरस्‍कार जेष्‍ठ साहित्‍यीक  रा.र बोराडे, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍कार साहित्‍यीक बाबाराव मुसळे आणि विशेष साहित्‍य गौरव पुरस्‍कार महेश लोंढे, अहमदनगर जिल्‍हा उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍कार हेरंब कुलकर्णी आणि डॉ.विखे पाटील पत्रकार लेखक पुरस्‍कार डॉ.बाळ ज.बोठे यांना देवून सन्‍मानित करण्‍यात आले. यावर्षीचा कलागौरव पुरस्‍कार अभिनेते मिलिंद शिंदे आणि समाजप्रबोधन पुरस्‍कार ह.भ.प शामसुंदर महाराज सोन्‍नर यांना देवून गौरविण्‍यात आले. या निमित्‍ताने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुस्‍तकांचे प्रकाशन करण्‍यात आले.

आपल्‍या भाषणात डॉ.अनिल काकोडकर म्‍हणाले की, पद्मश्रींनी शेतीवर आधारित नवीन औद्योगिक क्रांती सुरु केली. यातुन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्‍था उभ्‍या राहील्‍या. त्‍यापुढे जावुन आता लोकांचा सहभाग असलेल्‍या नव्‍या व्‍यवस्‍थेची निर्मिती करण्‍याची गरज व्‍यक्‍त करुन ते म्‍हणाले की, असलेल्‍या व्‍यवस्‍थेला तंत्रज्ञानाची जोड दिली गेली तर ग्रामीण भागातच प्रक्रीया करणा-या उद्योगांची साखळी निर्माण होवू शकेल. या निमित्‍ताने निर्माण होत असलेल्‍या नव्‍या ज्ञानप्रधान युगात इतर संधींबरोबरच विकेंद्रीकरणाचीही संधी आहे असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञान पो‍हचण्‍याच्‍या सुविधा आता सहज उपलब्‍ध झाल्‍या आहेत. आर्थिक उत्‍पन्‍न वाढविण्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या ज्ञानयुक्‍ततेतून शहरी भागाला जोडणार नवा ज्ञानसेतू निर्माण झाल्‍यास खरा ग्रामीण भारत सिध्‍द करता येईल. या ज्ञानसेतूना आम्‍ही आमच्‍या परिभाषेत ‘सिलेज’ म्‍हणतो. नवीन ग्रामरचना निर्माण करताना याचा निश्चितच उपयोग होईल. असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

कार्यक्रमाचे अध्‍यक्ष डॉ.सदानंद मोरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, सहकाराच्‍या माध्‍यमातुन पद्मश्रींनी मांडलेल्‍या विचारांमध्‍ये शेतक-यांचा सिंध्‍दांत आणि आवाज होता. विचारवंत मार्क्सनेही मांडलेल्‍या विचारांमध्‍ये सहकार हाच पर्याय सुचविला याकडे लक्ष वेधून डॉ.मोरे यांनी सांगितले की, सहकाराच्‍या माध्‍यमातुन झालेल्‍या विकासाचा पाया हा प्रगतीसाठी प्रेरक ठरला. त्‍याच पद्मश्रींच्‍या विचाराने या परिसराची सुरु असलेली वाटचाल ही महत्‍वाची वाटते. पद्मश्रींच्‍या नावाने दिल्‍या जाणा-या साहित्‍य पुरस्‍काराची घटना ही साहित्‍य विश्‍वात नवी प्रतिष्‍ठा निर्माण करणारी असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले.

साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ.लक्ष्‍मीकांत देशमुख म्‍हणाले की, स्‍वातंत्र्य, समता आणि बंधुता या विचारांतुन पुरोगामीत्‍वाचा विचार सहजपणे समोर येतो. कोणतेही साहित्‍य आणि कला हे मानवाला जीवन जगण्‍यासाठी महत्‍वाचे आहे. पण लेखक कलावंतानी आता आधुनिकतेचे मुल्‍य स्विकारले पाहीजे असे आवाहन करुन डॉ.देशमुख म्‍हणाले की, उद्याची पाहाट उगविण्‍यासाठी शासनच सर्व करेल या भ्रमात तुम्‍ही राहु नका. आपण सामान्‍य माणसं हे शेवटचे लाभार्थी आहोत. प्रगतीशिल चळवळीचा विचार मांडतानाच कलावंत आणि साहित्‍यीकांच्‍या पाठीशी विवेकवादी,विज्ञाननिष्‍ठ आणि मानवतावादी दृष्‍टीकोनाचा समाज उभा राहणे ही गरज असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍कार मिळालेले प्राचार्य रा.र बोराडे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, ग्रामीण महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीची पिछेहाट होत असुन त्‍याबद्द अंर्तमुख होवून विचार करण्‍याची गरज व्‍यक्‍त करतानाच पुरस्‍कार मिळालेल्‍या साहित्‍यीक कलावंताना आजही उदरनिर्वाहाची चिंता आहे. अशा साहित्‍यीकांकडुन नवीन साहित्‍याची निर्मिती होत नाही. याकडे लक्ष वेधत अशा साहित्‍यीकां पैकीच साहित्‍य अकादमीचा पुरस्‍कार मिळालेल्‍या नवनाथ गोरे यांचा उल्‍लेख करुन यास विखे परिवाराने नोकरीची संधी देण्‍याची केलेली विनंती विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यासपीठावरच मान्‍य केली. त्‍यामुळे विखे परिवार कोणत्‍या संस्‍कृतीत वावरतो याची प्रचिती आल्‍याचे त्‍यांनी नम्रपणे नमुद केले.

प्रारंभी विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी साहित्‍य पुरस्‍कारां मागची भुमिका विषद करुन उपस्थित साहित्‍यीकांचे स्‍वागत केले. प्रवरा परिवाराच्‍या वतीने सर्व मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. कारखान्‍याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध संस्‍थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्‍यप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

संताचा पुरोगामी वारसा शामसुंदर महाराज पुढे नेत आहेत

देशात आणि राज्यात धार्मिक उन्माद वाढत आहे. समतेची शिकवण देणाऱ्या पंढरीच्या वारीतही या प्रवृत्ती तलवारी घेऊन घुसून पाहात आहेत. संत वचनाचे दाखले देत त्याचा प्रतिवाद करण्याचे काम ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर करीत आहेत. त्यांचे हे धाडस खरोखर कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांनी काढले. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची पेरणी वारकरी संतांनी केली. जात-धर्माच्या पलिकडे जाऊन त्यांनी माणूसपण भक्कम करण्याचा प्रयत्न केला. तोच संतांचा विचार शामसुंदर महाराज सोन्नर समर्थपणे पुढे नेत आहेत, असे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष रावसाहेब कसबे म्हणाले.

Previous articleकेरळ पूरग्रस्तांसाठी रामदास आठवलेंची २५ लाखाची मदत
Next article कोळंबी व राळेगणसिध्दी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची चाचणी यशस्वी