कोळंबी व राळेगणसिध्दी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची चाचणी यशस्वी

कोळंबी व राळेगणसिध्दी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची चाचणी यशस्वी

ऊर्जा विभागाचा महत्त्वाकांक्षी टप्पा

मुंबई :  ऊर्जा आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि देशात प्रथमच राबविल्या जाणार्‍या अभिनव अशा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आता पूर्ण झाला आहे.

या योजनेअंर्गत महानिर्मिती, महावितरण आणि महाऊर्जा यांच्या संयुक्त वतीने उभारण्यात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कोळंबी आणि अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी येथील महानिर्मितीच्या प्रत्येकी २ मेगावॉट क्षमतेच्या महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पाची यशस्वी चाचणी शुक्रवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. त्यातून वीजनिर्मिती सुरु करण्यास यश मिळाले. आधी कोळंबी येथील व नंतर राळेगणसिध्दी येथील चाचणी घेण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे धडाडीचे ऊर्जावान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीने सौर क्षेत्रात एक वेगळी दमदार कामगिरी केली आहे. लवकरच या दोन्ही प्रकल्पाचे रीतसर लोकार्पण करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे शुक्रवारी राळेगणसिध्दी येथील प्रकल्प चाचणी प्रसंगी थोर समाजसेवक श्री. अण्णा हजारे हे जातीने उपस्थित होते. ऊर्जा खात्याच्या या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली असून या प्रकल्पामुळे त्या त्या परिसरात किमांन ५०० ते ६०० शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार म्हणून अण्णांनी समाधान व्यक्त केले आहे.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना मूर्त स्वरूपात आली आहे. हे दोन्ही प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीचे संचालक प्रकल्प विकास जयदेव व संचालक श्याम वर्धने, महावितरणचे संचालक प्रकल्प दिनेश साबू, संचालक सतीश चव्हाण, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक सतीश चवरे, महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ठप्पा गाठणे शक्य झाले, असे प्रतिपादन महानिर्मितीच्या सौर विभागाचे प्रादेशिक मुख्य अभियंता गणेश जाधव व प्रादेशिक मुख्य अभियंता मिलिंद नातू यांनी केले आहे.

राळेगण सिध्दी येथे चाचणीप्रसंगी सरपंच, उपसरपंच, कार्यकारी अभियंता पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता जोशी, ऊर्जा मंत्र्याचे खाजगी सहायक लांजेवार उपस्थित होते. महानिर्मितीच्या या यशाबद्दल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौर ऊर्जा चमूचे  अभिनंदन केले आहे.

Previous articleग्रामरचनेसाठी ज्ञानप्रधान युगाचा सेतू रचण्याची गरज : डाॅ. अनिल काकोडकर
Next articleशिवसेनेच्या वैद्यकीय पथकाकडून केरळमध्ये १० हजार रुग्णांवर उपचार