शिवसेनेच्या वैद्यकीय पथकाकडून केरळमध्ये १० हजार रुग्णांवर उपचार

शिवसेनेच्या वैद्यकीय पथकाकडून केरळमध्ये १० हजार रुग्णांवर उपचार

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३० डॉक्टरांचे वैद्यकीय पथक केरळमध्ये गेले दोन दिवस पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी झटत आहे. दोन दिवसांत १० हजारहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून अडीच टन औषधे विनामूल्य देण्यात आली आहेत.

कपडे, तांदूळ, डाळ, साबण, बिस्किटांचे पुडे आदी ५० टन सामानही शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने केरळमध्ये दाखल झाले असून एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूरग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध शिबिरांमध्ये या सामग्रीचे वाटप करण्यात आले.केरळमध्ये पुराने हाहाकार उडवला असून अद्यापही मदतीची आवश्यकता आहे. शिवसेनेने नेहमीच जात-पात-धर्म-भाषा यांच्या पलीकडे जाऊन संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. त्यामुळे केरळवासीयांसाठीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने पुढाकार घेतला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

काल शनिवारी अलेप्पी येथील एसडीव्ही स्कूल येथे वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तर रविवारी कनिचुलनगरा मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या मदत शिबिरात महावैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी मिळून १० हजारहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना प्रामुख्याने साथीच्या आजारांची बाधा होऊ नये, यादृष्टीने औषधे देण्यात आली. तसेच, सर्दी-खोकला, व्हायरल ताप आदी आजाराच्या सर्वाधिक तक्रारी होत्या. अलेप्पीचे जिल्हाधिकारी श्री. सुहास यांचीही एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्याकडेही शिबिरार्थींसाठी वैद्यकीय मदत सुपूर्द केली. स्थानिक खासदार वेणुगोपाल यांनी एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे यांची भेट घेऊन शिवसेनेचे आभार मानले.

शिवसेनेच्या पथकात वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे सदस्य डॉक्टर्स आणि आ. डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, धनंजय बोडारे, अरुण आशन आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.अलेप्पी येथील बॅकवॉटरच्या काठावर असलेल्या कोट्टनाडू येथील कैनगरी येथील अनेक घरे संपूर्ण पाण्याखाली गेली होती. केरळमधील सर्वात सखल भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो. पुरात हा भाग सर्वाधिक प्रभावित झाला होता. आजही येथील घरे अर्ध्याहून अधिक पाण्याखाली असून येथील रहिवाशांना शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बोटीने या संपूर्ण परिसराचा दौरा केला. तसेच येथे अद्यापही हाऊसबोटमधून वास्तव्य करून असलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधला.अलेप्पी आणि त्रिवेंद्रम जिल्ह्यात शिवसेनेच्या एकूण २२ रुग्णवाहिका पूर्णतः मोफत सेवा देत आहेत.

ठाण्यातल्या डॉक्टर मंडळींनीही आपल्या व्यग्र वेळापत्रकातून यासाठी ४ दिवस दिले, त्याबद्दल वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. जे. बी. भोर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. दिनकर देसाई आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचे मी आभार मानतो,’ असे शिंदे यांनी सांगितले.
केरळवासीयांसोबत साजरा केला ओणम केरळमध्ये ओणम सणाचे माहात्म्य मोठे आहे; परंतु यंदा पुराच्या पार्श्वभूमीवर कोणीही ओणम साजरा करण्याचा मनःस्थितीत नाही. हे ओळखून शिंदे यांनी पूरग्रस्तांच्या शिबिरात शिवसेनेच्या वतीने लाडूंचे वाटप करून त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे कोणाच्या घरी काही वाईट प्रसंग घडला असेल तर दिवाळी साजरी करत नाहीत. अशा वेळी आपण त्यांच्या घरी फराळ घेऊन जातो. तशाच प्रकारे केरळवासीयांना ओणमच्या शुभेच्छा दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Previous article कोळंबी व राळेगणसिध्दी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची चाचणी यशस्वी
Next articleशरद पवारांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक