अटक झालेल्यांपैकी एकही सनातनचा साधक नाही

अटक झालेल्यांपैकी एकही सनातनचा साधक नाही

सनातन संस्थेचा दावा

मुंबई : महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून मागील काही दिवसांमध्ये काही हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना अटक झाली. हे सर्व जण सनातनचे साधक असल्याची माहिती काही पुरोगामी व्यक्ती,संघटना, तसेच काँग्रेसकडून जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप करतानाच अटक झालेल्यांपैकी एकही जण सनातनचा साधक नाही असा दावा आज सनातन संस्थेच्यावतीने करण्यात आला आहे.

सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी आज पत्रकार परिषदेत वरील दावा केला आहे.कळसकर, अंदुरे, सुरळे बंधू आणि रेगे ही पाच नावे आम्ही प्रथमच ऐकली आहेत.त्यामुळे त्यांचा सनातनशी संबंध कोणीही जोडू नये असे स्पष्ट करीत अटक झालेल्यांपैकी एकही जण सनातनचा साधक नाही असा दावा राजहंस यांनी केला आहे. सनातन संस्था ही समाजात संविधानिक मार्गाने अध्यात्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था असून, सनातनची कोणतीही शिकवण हिंसाचाराच्या दिशेने नाही असेही राजहंस म्हणाले.

अटक झालेल्यांपैकी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदुसंघटनाच्या विविध उपक्रमांमध्ये स्थानिक स्तरावर सहभागी होत असले तरी, त्यांचे स्वतःचे विविध संघटनांच्या माध्यमातून कार्य चालू होते. त्यामुळे त्यांना अटक केल्याने सनातनवर बंदी घाला वा सनातनच्या प्रमुखांना अटक करा असे म्हणणे हास्यास्पद असून, आहे. अध्यात्मप्रसार करणार्‍या लहानशा सनातन संस्थेला सर्व पुरोगामी नेते लक्ष्य करत असले तरी,त्यांचा खरा उद्देश हा आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हिंदु आतंकवादाच्या नावे भाजप सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप राजहंस यांनी केला आहे.

सनातन संस्थेवर केले जाणारे सर्व आरोप हे एटीएस् आणि सीबीआय या तपाससंस्थांकडून अनधिकृतपणे मिळालेल्या माहितीच्या आधारे केले जात आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्र आतंकवाद विरोधी पथकाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते की,या प्रकरणी कुठल्याही विशिष्ट संघटनेचे नाव घेतलेले नाही. पोलीस तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत असताना मग या सर्व बातम्यांच्या मागे कोण सूत्रधार आहे  असा सवाल करीत ,यातील एकाही यंत्रणेने अधिकृतपणे सनातनचा संबंध असल्याचे सांगितलेले नसताना सनातनची होत असलेली मानहानी वेदनादायी असून, ही मानहानी रोखण्यासाठी सनातन संस्थेने या अनधिकृत माहितीच्या आधारे केल्या जाणार्‍या खोट्या आरोपांच्या संदर्भात न्यायालयीन खटले दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

आजवरच्या एकाही प्रकरणाच्या आरोपपत्रांत कुठेही सनातन संस्थेचे नाव आलेले नाही. सनातन संस्था आरोपी असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. सनातन संस्थेने देशविघातक कृत्य केले, असा कुठेही उल्लेख नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हे खोडसाळ आणि तथ्यहीन असल्याचे राजहंस म्हणाले.

आतंकवादविरोधी पथक न्यायालयात या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या उद्देशाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागते आणि इकडे बाहेर तपास होण्यापूर्वीच मराठा आंदोलनात स्फोट करण्याचा कट, ‘बकरी र्इद’ला घातपाताचा कट, ५०० प्रशिक्षित कार्यकर्त्यांची सेना इत्यादी आरोप केले जातात, ते समाज माध्यमातून सर्वत्र पसरवले जातात, हे सर्व राजकीय षड्यंत्र आहे. या प्रकरणी प्रसारित केल्या जाणार्‍या जातीवाचक संदेशांची चौकशी शासनाने करून त्यामागे नेमके कोण आहे, हे शोधले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.हिंदुत्ववादी शासन सत्तेत असल्याने हिंदुत्वाला बदनाम करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा आणि सनातनसारख्या संस्थेला संपवण्याचा हा प्रकार आहे असेही राजहंस म्हणाले.

Previous articleपंकजाताई मुंडे आणि महादेव जानकरांचे बहिण भावाचे अतूट नाते !
Next articleज्या पक्षाचे जास्त खासदार त्या पक्षाचा पंतप्रधान