समान जागा वाटपाचा कोणाताही प्रस्ताव नाही खा. अशोक चव्हाण

समान जागा वाटपाचा कोणाताही प्रस्ताव नाही खा. अशोक चव्हाण

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने काॅग्रेसला समान जागा वाटपाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून समान जागा वाटपाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव आला नसल्याचे सांगत आघाडी सन्मानपूर्वकच केली जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काॅग्रेसला समान जागा वाटपाचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाल्याची चर्चा होती. परंतु या वृत्ताचे खंडन काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५०-५० टक्क्यांचा कोणताही अधिकृत प्रस्ताव आला नाही असे सांगून आघाडी सन्मानपूर्वकच केली जाईल असे चव्हाण म्हणाले.

आज टिळक भवन येथे राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची बैठक प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. साडे पाच तास चाललेल्या या निवडणूकपूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची मते ऐकून घेतली. समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याबाबतही चर्चा झाली असून सन्मानजनक आघाडी व्हावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करून काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. समविचारी पक्षांसोबत आघाडी कऱण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत इतर पक्षांनीही आघाडीत बिघाडी होणार नाही यासाठी एक पाऊल पुढे यावे असे खर्गे म्हणाले.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हीच देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे व आम्ही सर्वजण मिळून त्यासाठीच प्रयत्न करित आहोत. भाजपच्या धर्मांध विचारधारेचा पराभव करून पुन्हा काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला.

खा. चव्हाण म्हणाले की, राज्यात समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असून, राष्ट्रवादीसह, बसप, शेकाप, भारिप बहुजन महासंघ, रिपाई कवाडे, रिपाई गवई, डावे पक्ष व इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत चर्चा सुरु आहे.

Previous articleमराठा समाजातील विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करणार
Next articleमंत्री गिरीश बापट यांच्या मंत्रालयीन कार्यालयास आयएसओ मानांकन