मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील नवीन मार्गिकेच्या बांधकामास मंजूरी

मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील नवीन मार्गिकेच्या बांधकामास मंजूरी

मुंबई : वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे  बांधकाम, सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देऊन एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली . या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री  राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता पश्चिम द्रुतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.

मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे  बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोल नाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणारा दोन टप्प्यातील बोगद्यांचे व त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी ११ कि.मी. असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन कि.मी. आहे. देशातील सर्वात मोठा असा ६५० मीटरचा केबल स्टेड पूल पर्यटकांसाठी आकर्षक असणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.

Previous articleमंत्री गिरीश बापट यांच्या मंत्रालयीन कार्यालयास आयएसओ मानांकन
Next articleमहिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी ३५ तर इतर बाबींसाठी ५० टक्के अनुदान मिळणार