मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यावरच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यावरच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण कसे देणार हे कायदेशीररीत्या स्पष्ट करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी आज कोल्हापूरातील सर्वपक्षीय आमदारांनी केली.मात्र असे अधिवेशन बोलावल्यास कायदेशीर अडचण निर्माण होईल. त्यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच लगेच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये सरकार चर्चा करेल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे समजते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलक गेली ४० दिवस दसरा चौकात ठिय्या आंदोलन करत आहेत. अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि
मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल हाती येतातच लगेच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये सरकार चर्चा करेल. त्या अगोदर अधिवेशन बोलाविल्यास या विषयात नव्याने कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर राज्यातील एकंदर आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होईल. त्यामुळे त्याचा शेड्युल नऊ मध्ये समावेश करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या मान्यतेची गरज आहे. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. त्याची आचारसंहिता लागल्यास केंद्राकडून याला मान्यता मिळू शकणार नाही. त्यामुळे आताच विधिमंडळाचे अधिवेशन बोलावून तसा प्रस्ताव पारीत करून केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी आमदारांनी केली. त्यावर आचारसंहितेच्या आधी मान्यता मिळवली जाईल, अशी खात्री मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.

या बैठकीला खासदार राजू शेट्टी, आ. अमल महाडिक, आ.डॉ सुजीत मिणचेकर, आ.सतेज पाटील,आ. राजेश क्षीरसागर, आ.संध्यादेवी कुपेकर, आ.उल्हास पाटील,आ. इंद्रजीत नरके,आ. सत्यजीत पाटील, आ.सुरेश हाळवणकर,आ. हसन मुश्रीफ आणि आ.प्रकाश आबीटकर उपस्थित होते. आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेचा तपशील ठिय्या आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांपुढे मांडणार असून, आंदोलन मागे घेण्याच्या दृष्टीने चर्चा करणार आहे. शुक्रवारी ही चर्चा होण्याची शक्यता आहे. येत्या चार सप्टेंबरला हे आंदोलक गाडी मोर्चा काढणार आहेत. चर्चेनंतर ते याबाबत पुढचा निर्णय घेतील, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

Previous articleजनसंघर्षाचे वादळ भाजपची सत्ता उधळवून लावेल
Next articleनोटाबंदीचा निर्णय म्हणजे “विळा मोडून खिळा केला”