मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना वाचवण्यासाठीच अटक सत्र !
नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : पुण्यामध्ये एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याने भीमा कोरेगावची घटना घडली असे भाजपचे म्हणणे असेल तर या परिषदेचे निमंत्रक माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सुध्दा माओवादी आहेत का असा सवाल करतानाच सध्या सुरू असलेले अटक सत्र हे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावरील लक्ष हटविण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.माओवादी असल्याच्या आरोपाखाली देशभरात पाच व्यक्तींना अटक करण्यात आली. यापूर्वीही चार जणांना अटक करण्यात आली. ज्या दिवशी भीमा कोरेगावची दंगल घडली त्यानंतर महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले त्यानंतर ही घटना मार्क्सवाद्यांनी घडवून आणल्याचे वक्तव्य भाजपकडून करण्यात आले असे मलिक म्हणाले.
पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा कुठे तरी कट रचून करुन सरकारने खेळखंडोबा सुरु केलेला आहे अशी टीका मलिक यांनी केली. देशभरात ठिकठिकाणी डॉ.दाभोळकर,कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचे अटकसत्र सुरु झाले. त्यांच्याकडून बॉम्ब,पिस्तुल हस्तगत करण्यात आले. याची देशभर चर्चा सुरू असतानाच त्यावरील लक्ष वळवण्यासाठी या पाच व्यक्तींना अटक करण्याचे सत्र पुणे पोलिसांनी सुरु केले आहे. एकंदरीत हे मॉडेल पाहिले तर गुजरात मॉडेल महाराष्ट्रात लागू झालेले आहे का अशी शंका मलिक यांनी व्यक्त केली.
सरकारने या पध्दतीने सगळे आंबेडकरवादी, मार्क्सवादी कार्यकर्ते हे अर्बन नक्षली आहेत हा जो आरोप लावण्यास सुरुवात केली आहे हे धोकादायक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या परिस्थितीला कधीही पुढे जावू देणार नाही. या सगळयांच्यासोबत आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा लढा सुरुच राहणारच आहे अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.











