गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्याची मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली

गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्याची मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली

गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारचा दिलासा

मुंबई : गणेशोत्‍सव मंडळांना मंडपाच्‍या परवानगीचे अर्ज करण्‍याची तारीख २ सप्‍टेंबर ऐवजी आता ५ सप्‍टेंबरपर्यंत वाढविण्‍यासासह गणेशोत्‍सवांना दिलासा देणारे महत्‍वाचे निर्णय आज मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्‍या बैठकीत घेण्‍यात आले.

आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्‍सवाबाबत महत्‍वाची बैठक घेतली. या बैठकीला गृह विभागाचे सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई व ठाण्‍याचे पोलिस आयुक्‍त, महापालिका व एमएमआरडीएचे आयुक्‍त व संबधित सर्व शासकीय यंत्रणांचे वरिष्‍ठ अधिकारी तसेच गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, गणेशोत्‍वस समन्‍वय महासंघाचे अध्‍यक्ष जयेंद्र साळगावकर, उपाध्‍यक्ष व पुण्‍याच्‍या महापौर मुक्‍ता टिळक, प्रमुख कार्यवाह सुरेश सरनौबत, किरण खानोलकर, किसन चोपडे, अविनाश जाधव, राजेंद्र झेंडे, उत्‍तम माटले यासर्व पदाधिका-यांसह मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आदी या बैठकीला उपस्थित होते.

गणेशोत्‍सव मंडळांना परवानगीसाठी अर्ज करण्‍याची शेवटची मुदत हि २ सप्टेंबर ऐवजी ५ सप्‍टेंबरपर्यंत वाढविण्‍यात यावी अशी मागणी या बैठकीत महासंघाचे पदाधिकारी, समन्‍वय समितीने केली त्यानुसार मुदत ५ सप्टेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांवरील गणेशोत्‍सव साजरा करण्‍यावरून दाखल करण्‍यात आलेले गुन्‍हे मागे घेण्‍याबाबत गठीत करण्‍यात आलेल्‍या उपसमितीला सदरचे गुन्‍हे मागे घ्यावेत अशीही मागणी करण्यात आली त्यानुसार असे गुन्हे मागे घेण्‍याबात सांगण्‍यात येणार आहे. यावर्षी परवानगीसाठी अर्ज करताना त्‍यासोबत सादर केलेली कागदपत्रे डिजिटल पध्‍दतीने संग्राहय करण्‍यात येतील त्‍यामुळे मंडळांना पुन्‍हा ही कागदपत्रे दरवर्षी सादर करावी लागणार नाहीत.मंडळांना सध्‍य स्थितीमध्‍ये वेगवेगळया सहा परवानग्या घ्‍याव्‍या लागातात त्‍या एकाच ठिकाणी एकाच अर्जात मिळण्‍याची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे.

गणेशोत्सव मंडळांची संख्‍या ही ६ हजार २१२ आहे असा शासकीय आकडा सांगतो तो दुरूस्‍त करायला करण्यात येवून यापेक्षा जास्‍त मंडळे आहेत याकडे आ. आशिष शेलार आणि समन्वय समितीने लक्ष वेधले.तसेच गणेशोत्‍सव आगमन व विसर्जन मार्गावरील रस्‍त्‍यावरील खड्डे बुजविण्‍यासाठी वेळ मर्यादा देण्‍यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अग्निशमन दल व वाहतुक पोलिसांच्‍या ना हरकत प्रमाणपत्र विनाविलंब मिळावे तसेच रात्री १२ वाजेपर्यंत लाऊड स्पिकर सुरू ठेवण्‍याची परवानगी गणेशोत्‍सवात केवळ ४ दिवस दिली जाते ती ५ दिवस करण्‍यात यावी अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. रात्री दहा नंतर मंडपामध्‍ये लाऊड स्पिकर शिवाय सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार असतील तर त्‍यांना रोखण्‍यात येऊ नये अशी मागणी समन्‍वय समिती व महासंघाने केली.

Previous articleमिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना वाचवण्यासाठीच अटक सत्र !
Next articleरिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम