साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंना भाजपची ऑफर !

साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंना भाजपची ऑफर !

सातारा : साता-याचे राष्ट्रवादी काॅग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना तिसऱ्यांदा खासदार व्हायचे असेल त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवावी अशी ऑफर खा.उदयनराजे भोसले यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून गेली लोकसभा निवडणूक लढविलेले आणि भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी दिली आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू केलेली असतानाच राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदार संघातही राजकीय फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे.राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असतानाही साता-याचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये असलेले संबंध संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहेत. साता-यातून यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उतरविले जाण्याची शक्यता असतानाच राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवावी अशी ऑफर खुद्द भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी दिली आहे

सातारा जिल्ह्याचा खरोखरच विकास करायचा खा.भोसले यांनी भाजपकडून निवडणुक लढवावी तरच ते तिस-यांदा खासदार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी मंत्रिमंडळात स्थान मिळवतील. याबाबत उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा पुरूषोत्तम जाधव यांनी व्यक्त केली आहे.भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल सर्वांनाच प्रेम आहे. परंतू त्यांची संसदेतील उपस्थिती अगदी नगण्य असून, गेल्या दोन टर्ममध्ये ते सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहोचू शकलेले नाहीत, अशी सर्वसामान्यांची खंत आहे.

गेल्या लोकसभा निवडणूकीत देशात नरेंद्र मोदींची लाट होती. तर सातारचे खासदार भोसले यांच्या विरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण असतानाही साताऱ्याची जागा शिवसेनेने का सोडली याचा खुलासा मंत्री शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावतेनी केला आहे.गेल्या लोकसभा निवडणूकीत मी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढविली. या निवडणूकीत मला एक लाख ५५ हजार मते मिळाली. गेल्या दहा वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. त्यामुळे उदयनराजेंना आगामी निवडणूक जिंकायची असेल आणि जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleगुरुदास कामत यांच्या स्मरणार्थ विलेपार्ले येथे शनिवारी प्रार्थना सभा
Next articleमहाराष्ट्राला सनातनची नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी