आ.भास्कर जाधवांच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याचे मंत्री चंद्रकांतदादांना समजते तेव्हा….
चिपळूण : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौ-यादरम्यान राष्ट्रवादीच्या आंदोलनात गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव नसल्याचे दादांच्या लक्षात आले.त्यानी याची माहिती घेतली असता आ. जाधवांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समजताच दादांनी थेट आ. जाधवांचे घर गाठले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौ-यावर असून,या रस्त्याच्या दुरवस्थेच्या विरोधात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आंदोलन पुकारले होते.मात्र या आंदोलनात चिपळूण पर्यंत आ. भास्कर जाधव कुठेच दिसले नसल्याचे दादांच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांना आ. जाधव यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मिळाली आणि दादांनी थेट चिपळूण येथिल आ.भास्कर जाधव यांचे घर गाठले आणि दुखापतग्रस्त आ. जाधवांची भेट घेवून विचारपूस केली.
चंद्रकांत दादा आपल्या भेटीसाठी आल्याचे समजताच आ. भास्कर यांनी याची कल्पना आपले पुत्र आणि जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांना दिली. विक्रांत यांनी चंद्रकांतदादांचे स्वागत केल्यानंतर डाव्या पायावर शस्त्रक्रिया झालेल्या आणि सध्या सक्तीचा आराम घेत असलेल्या आ. जाधवांना बुके देवून चंद्रकांतदादांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.यावेळी चिपळूणचे आ. सदानंद चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आ. डाॅ.विनय नातू आदी उपस्थित होते.










