आ.राम कदम यांच्या विरोधात भीम आर्मीची तक्रार

आ.राम कदम यांच्या विरोधात भीम आर्मीची तक्रार

कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

बहिणींच्या रक्षणासाठी भीम आर्मीचे विशेष दल

मुंबई : मुलींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार प्रवक्ते राम कदम यांच्या विरोधात भीम आर्मीची तक्रार दाखल केली असून,कदम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी दिली.

आ. कदम यांनी महिला आणि मुलींसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने तीव्र शब्दात निषेद केला आहे. लोकप्रतिनिधी आपल्या पदाची शपथ घेताना संविधानातील तरतुदीचे पालन करण्याची शपथ घेतात त्यात देशातील माता भगिनींचे रक्षण आणि सन्मान करण्याची देखील तरतूद असली तरी भाजपचे लोक असुरी संख्याबळावर संविधानाच्या तरतुदींवर हरताळ फासत आहेत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रिमाई फुले यांच्या कार्याचा या लोकांना विसर पडला आहे. अशी टीका या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे . भीम आर्मीने राम  कदम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज ठिकठिकाणी आंदोलने केली असून अमरावती येथे कांबळे यांनी स्वत; लेखी तक्रार देऊन कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर उद्या कळंबोली  येथे नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राम कदम यांच्या विरोधात जोडे मारा आंदोलन करण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले

आमदार राम कदम यांचा सरकारने राजीनामा घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि कदम यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा भीम आर्मीच्या महिला घरात घुसून त्यांच्या तोंडाला काळे फासतील असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे.

बहिणींच्या रक्षणासाठी भीम आर्मीचे विशेष दल 

महाराष्ट्रात माता भगिनी आणि विद्यार्थिनींच्या छेडछाडीला ऊत आला असून अल्पवयीन विद्यार्थिनी किंवा लहान मुलीदेखील आरोपींच्या तावडीतून सुटलेल्या नाही . २०१५-२०१६ या वर्षात एकट्या मुंबईत ३६६ अल्पवयीन मुली आणि २६६ महिलांवर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे  घडले असून ९५८ अल्पवयीन मुली आणि ४८ महिलांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली . फुले शाहू आंबेडकरी संत परंपरेच्या महाराष्ट्रात सुरु असलेले हे मानसिक अंध:पतन रोखणे सरकारचे काम आहे , राज्य सरकारच्या गृहखात्याचे आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे दारुण अपयश आहे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुंडगिरीने थैमान घातले असताना या सरकारने राक्षसी यशाच्या बळावर डोळ्यावर पट्टी बांधली आहे अशी टीका कांबळे यांनी केली . महाराष्ट्रातील माता भगिनी व विद्यार्थिनींच्या सन्मानाचे रक्षण करण्याची जबाबदारी भीम आर्मीने घेतली असून शाळा, महाविद्यालये किंवा कोठेही अन्याय अत्याचाराचे छेडछाडीचे प्रकार घडल्यास भीम आर्मीचे सैनिक त्या त्या ठिकाणी धावून जाऊन आया  बहिणींचे रक्षण करतील अशी माहिती कांबळे यांनी दिली . राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यांमध्ये भीम आर्मीचे हे विशेष दल लवकरच स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले.

Previous articleआ. राम कदम यांच्यावर कारवाई न झाल्यास विधानसभा चालू देणार नाही!
Next articleदलित हा शब्द अपमानास्पद नाही : आठवले