खडसे-शहांची दिल्लीत बैठक ; लवकरच नाराजी दूर करणार ?
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक झाली आहे.बैठकीचा तपशील समजला नसला तरी स्वपक्षाला आव्हान देणा-या खडसे यांची लवकरच नाराजी दूर केली जाणार असल्याची चर्चा आहे.
भोसरी येथिल एमआयडीसी जमीन प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वपक्षाला आव्हान देत राज्यभर “एल्गार यात्रा” काढण्याची घोषणा केली होती.गेली दिड वर्षे मंत्रिमंडळाच्या बाहेर असलेले खडसे यांची नाराजी पक्षाला जड जावू शकते याची कल्पना दिल्लीतील नेत्यांना आल्याने आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने खडसे दिल्लीत असून, आज सायंकाळी खडसे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत नाराज असलेल्या खडसेंची नाराजी दूर करण्यात आल्याचे समजते. तर; आगामी लोकसभा निवडणूकीत पक्षाला यश मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.